कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आंजर्ले कासव महोत्सवास स्थगिती
`आंजर्ले कासव महोत्सव २०२०`ला तूर्तास स्थगिती
रत्नागिरी : चीनपासून सुरुवात झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही त्याने पाऊल टाकले असून महाराष्ट्रातही कोरोनाचे ११ रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभुमीवर राज्य सरकार, सेवाभावी संस्था, कार्यालयांतर्फे खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. दरम्यान यंदाच्या 'आंजर्ले कासव महोत्सव २०२०'ला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे.
वन विभाग महाराष्ट्र शासन, कांदळवन कक्ष महाराष्ट्र शासन, सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण, आंजर्ले ग्रामपंचायत आणि आणि कासव मित्र आंजर्ले या संस्थांनी सल्लामसलत करून हा निर्णय घेतला आहे.
कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. याचा महाराष्ट्रातही शिरकाव झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून आम्ही तुर्तास आंजर्ले कासव महोत्सवाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याचे कासवमित्र अभी केळसकर यांनी सांगितले.