सतिश मोहिते, झी मीडिया, नांदेड : भारत विकसनशील देशाकडून विकसित होण्याच्या मार्गावर आहे. मात्र अद्यापही देशात नागरिकांना त्यांना त्यांच्या मूलभूत सुविधांपासूनही वंचित राहावं लागत आहे. मोठ्या प्रमाणात विकास होत असला तरी आदिवासी भागात राहणाऱ्या अनेकांना शिक्षणापासून सरकारी सुविधा मिळवण्यापर्यंत मोठे कष्ट करावे लागत आहेत. महाराष्ट्राच्या नांदेडमध्ये (Nanded) शेकडो आदिवासांनी जात वैधता प्रमाणपत्र (caste validity certificate) मिळत नसल्याने हिंदू देव देवतांचा (Hindu gods) त्याग केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीचे आदिवासी कोळी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने नाकारल्याने आदिवासी बांधवांनी चक्क देव देवतांचा त्याग केला आहे. नांदेड जिल्ह्यातील मयुरी पुंजरवाड ही आदिवासी कोळी समजाची विद्यार्थिनी एम बी बी एस झाली आहे. पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी तिने संभाजीनगरच्या जात वैधता पडताळणी समितीकडे अर्ज दिला होता. समितीने वैधता तपासणी करत जात वैधता नाकारली. अर्जदार मयुरीने महादेव शंकर आणि खंडोबाची पूजा करत असल्याचे सादर केले आहे. 


तहसीलदारांकडे हिंदू देव देवतांचा त्याग


महादेव आणि खंडोबाची पूजा साधारणतः हिंदू धर्मात केली जाते. तसेच अर्जदाराची विवाह पद्धाती हिंदूप्रमाणे असल्याची सबब देत जात पडताळणी समितीने प्रमाणपत्राची वैधता नाकारली. या निकालानंतर आदिवासी कोळी समाज बांधव आक्रमक झाले. गुरुवारी नांदेडमध्ये शेकडो आदिवासी महिला आणि बांधवांनी देव सोबत घेत देव देवतांचा त्याग करण्यासाठी आंदोलन केले. मोर्चाला परवानगी न दिल्याने आदिवासी कोळी बांधवांनी आय टी आय चौकात सभा घेत तहसीलदार आंबेकर यांच्याकडे आपल्या देव देवता सुपूर्द केल्या. 


शेकडो महिला आणि पुरुषांनी देव देवतांना तहसीलदारांकडे देत त्यांचा त्याग केला आहे. हिंदू देव देवतांची पूजा केल्याने जर जात वैधता नाकारली जात असेल तर अशा हिंदू देव देवतांचा आम्ही त्याग करत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.


हिंदू देववतांची पूजा करुन शिक्षा


"जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने उच्च शिक्षणासाठी मला प्रवेश मिळत नव्हता. आम्ही आदिवासी लोक हिंदू देवतांची पूजा करतो म्हणून जात वैधता प्रमाणापत्र अवैध ठरवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हिंदू देववतांची पूजा करुन आम्हाला एवढी मोठी शिक्षा मिळत असल्याने आम्ही त्यांना सन्मापूर्वक जिल्हाधिकाऱ्यांकडे समर्पित करणार आहोत. त्यानंतर तरी आम्हाला जात वैधता प्रमाणपत्र द्यावे," अशी मागणी एका तरुणीने केली आहे.


आंदोलन करु नये म्हणून अत्याचार


"आंदोलनाच्या ठिकाणापासून चार ते पाच किलोमीटर असताना मला पोलिसांनी अडवले. त्यानंतर पोलीस ठाण्यात नेऊन मला साडेतीन तास रोखून धरले. तुम्ही आंदोलनाला जाऊ नका असे त्यांचे म्हणणे होते. कोणतेही आंदोलन करु नये यासाठी अत्याचार सुरु आहेत. देव देवतांचा त्याग करण्यासाठी आले असताना आम्हाला आचारसंहितेचे कारण सांगण्यात आले. आता मी माझ्या मुलीचे लग्न आदिवासी पद्धधतीने करणार आहे. हिंदू पद्धतीमध्ये बरबटला गेल्यामुळे त्याचा त्याग करणार आहे," असे आंदोलनातील एका व्यक्तीन म्हटले आहे.