अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : सिल्लोडचे बंडखोर काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची त्यांनी आज मातोश्रीवर भेट घेतली. सिल्लोडच्या भाजपा नेत्यांचा सत्तार यांच्या पक्षप्रवेशाला विरोध आहे. त्यांनी प्रसंगी बंडखोरीचा इशाराही दिला आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखेंच्या भाजप प्रवेशावेळी सत्तार यांनी पक्षप्रवेश टाळला. भाजपला सत्तारांच्या काही अटीही मान्य नसल्याचंही समजतं आहे. त्यामुळे त्यांनी आता शिवसेनेत चाचपणी चाचपणी सुरू केली आहे. पक्षप्रवेशाबाबत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस अंतिम निर्णय घेतील, असं सत्तार यांनी या भेटीनंतर सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसमध्ये बंड केले होते. काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. त्या दरम्यान त्यांनी शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांची भेट घेतली होती. खोतकर हे दानवेंच्या विरोधात उभे राहणार होते. पण शेवटी खोतकरांची मनधरणी करत त्यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगण्यात आलं. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भाजपमधून विरोध होत आहे. त्यामुळे ते आता शिवसेनेच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.