Sanajy Raut On CM Eknath Shinde: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. या प्रकरणावरुन राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणांच्या निमित्ताने जो नंगा नाच पाहाया मिळत आहे तो अवस्थ करणारा आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं, असंही राऊत म्हणाले. यावेळेस संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी उल्हासनगरमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या गोळीबार प्रकरणाचा संदर्भ देत मुख्यमंत्री शिंदेंना लक्ष्य केलं.


शिंदेऐवजी इतर कोणी असतं तर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणपत गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंचा उल्लेख केल्याचं सांगितलं. "कल्याणला गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. त्यामध्येही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाचं नाव आलेलं आहे. खरं म्हणजे पोलिसांनी ताबडतोब एकनाथ शिंदेंची चौकशी करायला पाहिजे होती. इतर ठिकाणी असा गुन्हा झाला असता, आरोपीने कोणाचं नाव घेतलं असतं तर पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन जबाब नोंदवून एफआयआर दाखल केला असता. पण आरोपी (गणपत गायकवाड) सांगत आहे की एकनाथ शिंदेंमुळे मी गोळीबार केला. माझे कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदेंकडे पडलेले आहेत, तरीही यात राज्यातला कायदा, पोलीस काहीही आक्षेप घ्यायला तयार नाहीत. यामागील मुख्य कारण म्हणजे ते (एकनाथ शिंदे) मुख्यमंत्री आहेत," असं राऊत म्हणाले. 


दिला इतर राज्यांचा संदर्भ


राऊत यांनी भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात कारवाया झाल्याचा संदर्भही दिला. "झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते. दिल्लीतील मुख्यमंत्र्यांना अटक करण्याची योजना सुरु आहे. पण आरोपींना पाठीशी घालणाऱ्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना जाब विचारला जात नाही हे अत्यंत दुर्देवी आहे," असंही राऊत यांनी म्हटलं. 


नक्की वाचा >> 'घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला CM शिंदेंनी दिलेली पक्ष प्रवेशाची ऑफर'; '4 दिवसांपूर्वीच..'


गणपत गायकवाड मुख्यमंत्री शिंदेंबद्दल नक्की काय म्हणालेले?


2 फेब्रुवारीच्या रात्री उल्हानगरमधील हिललाईन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल जगताप यांच्यासमोरच पोलीस स्टेशनमध्ये गोळीबाराची घटना घडलेली आहे. एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड आणि राहुल पाटील या हल्ल्यामध्ये जखमी झाले. जमीनीच्या वादातून गणपत गायकवाड यांनी हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. गणपत गायकवाड यांना या गोळीबारानंतर पोलीस स्टेशनला बसून ठेवण्यात आलं. या घटनेनंतर 'झी 24 तास'शी बोलताना गणपत गायकवाड यांनी आपणच गोळीबार केल्याची कबुली दिली. "पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा या लोकांनी जबरदस्तीने कब्जा घेतला. मला मनस्ताप झाला आणि म्हणून मी फायरिंग केली," असं गणपत गायकवाड यांनी म्हटलं. तसेच पुढे बोलताना गणपत गायकवाड यांनी, "एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला आज एकनाथ शिंदेंनी गुन्हेगार बनवलं आहे," असं म्हणत थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.


नक्की वाचा >> मृत्यूआधी आदित्य ठाकरेंना भेटलेले घोसाळकर! जाहीर सभेत आदित्य म्हणाले, 'आता 5 वाजता...'


एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांचं आयुष्य खराब करायला घेतलं


"मी स्वत: गोळ्या झाडल्या. मला काही पश्चाताप नाही. माझ्या मुलांना पोलिसांसमोर जर मारत असतील तर मी काय करणार?" असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला. "पोलिसांनी पकडलं मला. मी त्यांना जीवे मारणार नव्हतो. पण माझ्याबरोबर असं कोणी करत असेल पोलिसांसमोर तर मला आत्मसंरक्षणासाठी हे करणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदेसाहेबांनी महाराष्ट्रभर असेच गुन्हेगार पाळून ठेवलेले आहेत," असं आमदार गणपत गायकवाड म्हणाले होते. "एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांचं आयुष्य खराब करायला घेतलं आहे," असंही गणपत गायकवाड म्हणालेले.


नक्की वाचा >> तो फोन कॉल, ऑफिसमधले लाईट्स गेले अन्..; Eyewitness ने सांगितला घोसाळकरांवरील गोळीबाराचा थरार


श्रीकांत शिंदेंचाही उल्लेख


"मी वरिष्ठांना बऱ्याचदा सांगितलं होतं की हे लोक वारंवार माझा अपमान करतात. माझा निधी वापरला जातो त्या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे स्वत:चे बोर्ड लावतात जबरदस्तीने. मी वेळोवेळी सांगितलं आहे. मी ज्या ज्या ठिकाणी राज्य शासनाचा निधी आणला त्या ठिकाणी श्रीकांत शिंदेंनी आपले बोर्ड लावले. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. एकनाथ शिंदेंनी त्या भ्रष्टाचारामध्ये किती पैसे खाल्ले हे त्यांनी सांगावे," असंही गणपत गायकवाड म्हणालेले.