Abhishek Ghosalkar Shoot Dead: "गेल्या दीड वर्षात महाराष्ट्र हे देशातील सगळ्यात असुरक्षित राज्य बनले आहे. रोज कोठे ना कोठे हत्या होत आहेत व राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री ‘शेमलेस’ पद्धतीने यातील गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे गुंडांचे राष्ट्र झाले की काय? असे वाटू लागले आहे," असं म्हणत उद्धव ठाकरे गटाने अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूनंतरच्या 'सामना'च्या अग्रलेखातून हल्लाबोल करताना म्हटलं आहे. "अभिषेक घोसाळकर या तरुण-तडफदार शिवसेना पदाधिकाऱयाची गुरुवारी संध्याकाळी हत्या झाली. अभिषेकवर अंदाधुंद गोळीबार करून मारेकऱ्याने स्वतःवरही गोळी झाडून घेतली. त्यामुळे या प्रकरणातील संशय वाढला आहे. महाराष्ट्राला हादरा देणाऱ्या मुंबई शहरात कल्लोळ माजवणाऱ्या या हत्येने मुख्यमंत्री व त्यांच्या गृहमंत्र्यांच्या तोंडावरील रेषादेखील हलली नाही," असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.


फडणवीस जनतेला कुत्र्याची उपमा देत आहेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या अन्य एका विधानाचाही ठाकरे गटाने खरपुस शब्दांमध्ये समाचार घेतला आहे. ‘‘गाडीखाली येऊन कुत्र्याचे पिल्लू मेले म्हणून विरोधक राजीनामा मागणार काय?’’ या निर्लज्ज वक्तव्याचा निषेध करावा तेवढा थोडाच. महाराष्ट्रात गुंडगिरीस बळी पडलेल्या जनतेस ते कुत्र्याची उपमा देत आहेत. हिंदू धर्मात, मानवधर्मात कुत्र्यासही म्हणजे प्राणिमात्रासही सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. तोच खरा हिंदू धर्म आहे, पण फडणवीस त्यांचे गुरू मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवून हवे तसे बोलत आहेत," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.


नक्की वाचा >> मृत्यूआधी आदित्य ठाकरेंना भेटलेले घोसाळकर! जाहीर सभेत आदित्य म्हणाले, 'आता 5 वाजता...'


शिंदेंची कॅबिनेट बैठकांपेक्षा गुंडांच्या बैठकांनाच जास्त हजेरी


"राजकारणी गुंडांना आश्रय देतात असेच आतापर्यंत सांगितले जात होते, पण महाराष्ट्रात राजकारण आणि सत्ता गुंड-माफियांच्या हाती गेल्याचे दिसत आहे. रोज घडणाऱ्या घटनांनी महाराष्ट्राच्या प्रतिमेस कलंक लागलाच होता, पण अभिषेक घोसाळकर यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करून ज्या पद्धतीने निर्घृण हत्या केली त्यामुळे महाराष्ट्रालाच हादरा बसला. शिवसेनेचे उपनेते व कडवट निष्ठावान शिवसैनिक विनोद घोसाळकर यांचे अभिषेक हे चिरंजीव. स्वतः अभिषेक शिवसेनेचे नगरसेवक होते. मुंबई बँकेचे संचालक होते. शिवसेनेच्या संकटकाळात ते पिता-पुत्र एका निष्ठsने खंबीरपणे उभे राहिले. अशा लढवय्या तरुण कार्यकर्त्यावर एका गुंडाने बेछूटपणे गोळ्या झाडून हत्या केली. राज्यातील घटनाबाह्य सरकार गुंडांच्या हातचे बाहुले झाल्यानेच राज्यात अशी गुंडगिरी बिनधास्त सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे कॅबिनेट बैठकांपेक्षा गुंडांच्या बैठकांनाच जास्त हजेरी लावतात," अशी टीका लेखातून करण्यात आली आहे.


शिंदे हेच महाराष्ट्रात गुन्हेगारांचे ‘बॉस’


"राज्याची ठेकेदारी, अर्थकारण गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या हाती देऊन शिंदे गँग अशा पद्धतीने स्वतःला मजबूत करू पाहत असेल तर हे गुंडांचे राज्य उलथवून टाकण्याची हिंमत शिवसेनेत आहे. ही शिवसेना म्हणजे निवडणूक आयोगाकडून विकत घेतलेली शिंद्यांची मिंधी सेना नसून महाराष्ट्राची स्वाभिमानी आहे. कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच गोळीबार केला. शिंदे हेच महाराष्ट्रात गुन्हेगारांचे ‘बॉस’ आहेत, असा आरोप सत्ताधारी पक्षाचा एक आमदार करतो व त्याचा हा आरोप हवेत बंदुकीच्या गोळ्यांप्रमाणे ‘ठो ठो’ उडत असतानाच मुंबईत अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार होऊन त्यांची हत्या केली जाते," असं म्हणत शिंदेंना लक्ष्य करण्यात आलं आहे.


नक्की वाचा >> कोरोना योद्धा पुरस्कार विजेता ते मारेकरी... मॉरिस भाई आणि घोसाळकरांमध्ये नेमका वाद काय होता?


गुंडांच्या ‘वर्षा’वरील सरदारांवर सोपवले राज्य?


"फडणवीस हे आतापर्यंतचे सगळ्यात अपयशी व अकार्यक्षम गृहमंत्री ठरले आहेत. खून, अपहरण, खंडणी, भ्रष्टाचार, वसुली फडणवीस काळात जोरात सुरू आहे, पण गृहमंत्री फडणवीस डोळ्यांवर पट्टी बांधून बसले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फक्त गुंड आणि झुंडशाहीचे थैमान चालले आहे. अशा वेळी गृहमंत्र्यांनी मंत्रालयात ठाण मांडून बसायला हवे. पोलीस आणि गुंडांवर जरब बसवण्यासाठी कारवाईचे आदेश द्यायला हवेत. महाराष्ट्र राज्य त्यांनी गुंड आणि गुंडांच्या ‘वर्षा’वरील सरदारांवर सोपवले काय? नगर जिल्ह्यात आढाव या वकील दांपत्याची हत्या झाली. नगरमधील आमदार व त्यांच्या सग्यासोयऱ्यांनी जोरजबरदस्तीने लोकांच्या इस्टेटी बळकावण्याचे काम सुरू केले आहे. राज्यातील जनता इतकी भयभीत व असहाय्य कधीच झाली नव्हती. महाराष्ट्र एक राज्य म्हणून नेहमीच ताठ मानेने जगले. आज त्या ताठ कण्यावर गुंडगिरीने आघात केला आहे," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.


नक्की वाचा >> तो फोन कॉल, ऑफिसमधले लाईट्स गेले अन्..; Eyewitness ने सांगितला घोसाळकरांवरील गोळीबाराचा थरार


महाराष्ट्राची ‘वाट’ चुकली


"अमित शहा व नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रावर एक घटनाबाह्य राज्य व मुख्यमंत्री लादले. त्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून लुटीचा माल गुजरातला पोहोचवला जातोय. मिंधे सरकारने जागोजाग भामटे आणि पेंढारी नेमून लूट व दरोडेखोरी चालवली आहे. त्यासाठी खून पडले तरी चालतील. राज्याची अवस्था कमालीची बिकट झाली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने ही बिकट परिस्थिती किती टोकाला गेली ते दिसले. पोलीस पक्षपाती बनले आहेत व आपापल्या टोळीतल्या पोलीस अधिकाऱ्यांनाच मोक्याच्या जागी नेमून सरकारपुरस्कृत गुंडांना संरक्षण दिले जात असेल तर दुसरे काय होणार? महाराष्ट्र हा नेहमीच देशाचा मार्गदर्शक राहिला. महाराष्ट्राच्या वाटेने देश पुढे गेला. आज महाराष्ट्राची ‘वाट’ चुकली आहे. त्यामुळे राज्याची वाट लागलेली दिसत आहे. राज्यात लुटारू टोळ्या व भामट्यांना बरे दिवस आले आहेत. असे घडते तेव्हा राष्ट्र लयास जाते. महाराष्ट्राचे तसेच होत आहे. घोसाळकरांच्या हत्येने महाराष्ट्राच्या पापण्या ओलावल्या. त्या पापण्यांतून ठिणग्याही उडतील, हे गुंडांचे राज्य पोसणाऱ्यांनी लक्षात ठेवावे," असा इशारा ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांना दिला आहे.


वायफळ बडबड गृहमंत्री का करीत आहेत?


‘‘या प्रकरणाला काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतात. काल घडलेली घटना वैयक्तिक वैमनस्यातून घडली. याला राजकीय रंग देणे योग्य नाही,’’ असे गृहमंत्री म्हणतात. अभिषेक याचे मारेकऱ्याशी काय वाद होते याचा तपास अद्यापि व्हायचा आहे, पण गृहमंत्र्यांनी जाहीर करून टाकले, वैयक्तिक भांडणातून हत्या झाली. म्हणजे या घटनेवर पडदा टाकून तपास गुंडाळण्याचा हा प्रयत्न आहे. हत्यारा मॉरिसभाईचे अलीकडे मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’वर जाणे-येणे होते व मुख्यमंत्र्यांशी त्याच्या भेटीगाठी झाल्या हे सत्य गृहमंत्री नाकारणार आहेत काय? अभिषेक घोसाळकर हा अत्यंत विनम्र व अजातशत्रू होता. त्यामुळे वैयक्तिक वैमनस्यातून त्याची हत्या झाल्याची वायफळ बडबड गृहमंत्री का करीत आहेत? ते कोणाच्या अपराधावर पांघरुण घालत आहेत? महाराष्ट्रात गुंडगिरीचा उन्माद वाढला आहे व घोसाळकरांची हत्या हे त्या उन्मादाचे टोक आहे. म्हणून अपयशी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करताच फडणवीस यांनी केलेले वक्तव्य अत्यंत दळभद्री तसेच माणुसकीला काळिमा फासणारे आहे," असं म्हणत ठाकरे गटाने फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.