रामायणावर आधारित नाटकामुळे पुणे विद्यापीठात मोठा राडा, विद्यार्थ्यांना मारहाण
रामायणावर आधारित असलेल्या एका नाटकातील आक्षेपार्ह विधानामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
ABVP Activist Lalit Kala Kendra Student Beat : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात मोठा राडा झाला आहे. ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. रामायणावर आधारित असलेल्या एका नाटकातील आक्षेपार्ह विधानामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात ललित कला केंद्र आहे. या ललित केंद्राची आज परीक्षा सुरु होती. या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा भाग म्हणून नाटक सादर करायचे असते. या विद्यार्थ्यांनी जब वी मेट या नावाचे नाटक आयोजित केले होते. या नाटकात रामायणात काम करणाऱ्या कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्षेप घेतला.
घटनास्थळी पोलीस तैनात
या नाटकाचे लेखन ललित कला केंद्राचा विद्यार्थी असलेल्या भावेष राजेंद्र याने लिहिले होते. विशेष म्हणजे या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शनही केले होते. मात्र या नाटकातील संवादांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि नाटकाचा प्रयोग उधळून लावला. यावेळी नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण देखील करण्यात आली. याचे अनेक व्हिडीओही समोर आले आहेत.
या संपूर्ण प्रकरणानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. यात आता पुढे काय कार्यवाही होते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.