चाळीसगाव : परवडत नाही म्हणून बऱ्याचवेळा शेतकऱ्यांकडून रस्त्यावर फेकला जाणाऱ्या कांद्याला सध्या चांगले दिवस आलेय. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल ४ हजार पाच रुपये एवढा राज्यातील उचांकी भाव मिळालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वीही याच बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल ३७०० एवढा भाव मिळाला होता. चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आलीय. यंदा कांद्याचं उत्पादनदेखील चांगलं आल असून भावही चांगला मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठं समाधान आहे. 


चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी कांदा विक्री करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठांचा आश्रय घ्यावा लागत होता. मात्र गेल्या वर्षभरापासून चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांचा यातून मोठा आर्थिक फायदा झालाय. 


वाहतुकीला प्रतिट्रॅक्टर लागणाऱ्या खर्चात तीन हजार रुपयांची कपात झाल्यानं त्याचाही फायदा कांदा उत्पादकांना या स्थानिक बाजार पेठेत कांदा विकल्यानं होतोय. दरम्यान, भाव कमी मिळतो म्हणून नेहमी शेतकऱ्यांना रडविणारा कांदा यंदा मात्र ग्राहकांना रडवून सोडणार आहे.