अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : हल्ली सर्वकाही ऑनलाईन मिळत असताना औषधांची ऑनलाईन विक्रीदेखील तेजीत आहे. मात्र या पुढच्या काळात औषधांची ऑनलाईन खरेदी -विक्री थांबवावी लागणार आहे. दिल्ली उच्च नयायलायाच्या आदेशानंतर पुण्यामध्ये ऑनलाईन औषध विक्रेत्यांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील प्लॅनेट फार्मा या औषध विक्रेत्याला नोटीस बजावण्यात आली आहे. औषधांची ऑनलाईन विक्री करत असल्या कारणानं अन्न आणि औषध प्रशासनानं ही कारवाई केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं दिलेल्या एका निकालानंतर उचलण्यात आलेलं हे पहिलं पाऊल आहे. सध्या इंटरनेटवर ऑनलाईन औषध विक्रीचा अक्षरशः बाजार झाला आहे. ग्राहकांचाही त्याला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. मात्र या औषध विक्रीला कायदेशीर मान्यता नाही. ग्राहकाला बनावट तसंच कमी गुणवत्तेची औषधं विकली गेल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर औषधांच्या ऑनलाईन विक्रीला अन्न आणि औषध प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे.


औषधांची ऑनलाईन विक्री बंद करावी अशी औषध दुकानदारांची फार पूर्वीपासूनची मागणी होती. त्यामुळे त्यांनीही या कारवाईचं स्वागत केलं आहे. ऑनलाईन औषध विक्रीमध्ये नशेच्या गोळ्या तसंच गर्भपाताच्या किट्सना अधिक मागणी आहे. हा प्रकार केवळ अनधिकृत नसून असुरक्षितही आहे.  तेव्हा आता हाती घेतलेली ही कारवाई कितपत प्रभावी ठरते हे लवकरच स्पष्ट होईल.