वाल्मिक जोशी / जळगाव : कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार 7 ते 11 या वेळेत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी आहे. मात्र, जिल्ह्यात काही ठिकाणी कोविड नियमांचे आणि निर्बंधाचे उल्लंघन होत आहे. उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केल्याने मुजोर विक्रेत्यांनी पोलीस आणि  होमगार्ड यांच्यावर हल्ला केला. (Attack on Police by Vendors in Jamner at Jalgaon)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर येथे आठवडे बाजार 7 ते 11 या वेळेत बाजारात खरेदी विक्रीची परवानगी होती. परंतु काही विक्रेत्यांनी नियमांचे उल्लंघन करत जास्त वेळ दुकाने उघडी ठेवत गर्दी केली. त्यामुळे पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल सुरवाडे, दिनेश मारवडकर आणि दोन होमगार्ड हे आपले कर्तव्य बजावत असतांना बाजारातील सहा फळ विक्रेत्यांनी अनिल सुरवाडे यांच्यावर हल्ला केला तर वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकाराशी देखील हुज्जत घातली.


 कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. परंतु अनेक नागरिक मात्र या निर्बंधांची पायमल्ली करत आहेत. असाच काहीसा प्रकार जामनेर येथील फत्तेपुर गावात घडला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करायला गेलेल्या पोलीस आणि पत्रकारांशी हुज्जत घालत त्यांच्यवर हल्ला करण्यात आला. यामुळे बाजारात मोठा गोंधळ उडाला होता.


या घटनेची माहिती वरिष्ठांना देण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक राहुल खताळ हे  तात्काळ घटनास्थळी पथकासह हजर झाले आणि हल्ला करणाऱ्या  सहा फळ विक्रेत्यान विरोधात गुन्हा दाखल  केला. तसेच एका फळ विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. तर इतर हल्ला करणारे पाच विक्रेते फरार असल्याने त्यांचा देखील शोध पोलीस घेत येत आहेत.