सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : राज्यात पुन्हा एकदा ईडीच्या (ED) कारवाईला वेग आला आहे. रविवारी सकाळीच ईडीचे अधिकारी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी चौकशी साठी दाखल झाले होते. नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊतांना ई़डीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईडीच्या कारवाईसोबतही संजय राऊत यांच्यावर आणखी एका प्रकरणी कारवाई होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्यासंदर्भात एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्यानंतर कारवाई करण्याची मागणी करण्यात येऊ लागली आहे.


एका प्रकरणात स्वप्ना पाटकर यांना धमकी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी काल पोलिसांनी या प्रकरणात एनसी दाखल केली होती.आज संध्याकाळपर्यंत ही एनसी एफआयआरमध्ये परीवर्तित केली जाईल असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं.


त्यानंतर आता व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत राज्य महिला आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.


संजय राऊत ऑडिओ क्लिप मधील महिलेबाबत राज्य महिला आयोगाकडे तक्रार आलेली नाही,पण गुन्हा दाखल झाला आहे. त्यासंदर्भात माहिती घेत आहोत. त्याबाबत राज्य महिला आयोगाला अहवाल सादर करावा अस सांगितलं आहे, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.


जोपर्यत ऑडिओ व्हिडीओ क्लिप सिद्ध होत नाहीय तोपर्यंत कारवाई करता येत नाही, असेही सूचक विधान रुपाली चाकणकर यांनी केले आहे.


राहुल शेवाळेंवर कारवाई होणार 


शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्याबाबत एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. या महिलेने शेवाळे यांनी आपल्यावर बलात्कार केला असून मानसिक छळ केल्याचा आरोप केला. याबाबतही रुपाली चाकणकर यांनी भाष्य केले आहे.


मला आश्चर्य वाटतं की खासदार राहुल शेवाळे यांच्याबाबत संबधित महिलेने एप्रिलमध्ये साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये चारवेळा तक्रार दिली होती. तरीही तक्रा दाखल झाली नाही. याप्रकरणी आम्ही संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना बोलवून आजपर्यंत तक्रार का दाखल झाली नाही याचा अहवाल मागितला होता. पण त्यांनी तपास अधिकारी आजारी असल्याचे सांगितले. राज्य महिला आयोगाच्या वतीने त्यांना चार दिवसांची मुदत दिली होती. उद्या १ ऑगस्टला तक्रार दाखल करुन अहवाल देण्यास सांगितले आहे, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.