सुमित राघवनने फेसबुक लाईव्हवर मांडली नाट्यगृहाची दुरावस्था
लोकप्रिय अभिनेता सुमीत राघवनने फेसबुक लाईव्हवर औरंगाबादमधील संत एकनाथ रंगमंदिराची दुरावस्था मांडली आहे.
औरंगाबाद : लोकप्रिय अभिनेता सुमीत राघवनने फेसबुक लाईव्हवर औरंगाबादमधील संत एकनाथ रंगमंदिराची दुरावस्था मांडली आहे.
त्यामुळे औरंगाबाद पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या कारभाराची चांगलीच पोलखोल झाली आहे. सुमितने गेल्यावर्षी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या दुरवस्था सर्वांसमोर आणली होती.
सुमित राघवन आणि टीम सध्या 'एक शून्य तीन' या नाटकाच्या प्रयोगासाठी दौरे करत आहे. दरम्यान १२ तासांचा प्रवास करून सुमीत राघवन, स्वानंदी टिकेकर यांच्यासह संपूर्ण टीम संत एकनाथ रंगमंदिरात पोहोचले. पण समोर रंगमंदिराची दुरावस्था पाहून त्यांना धक्काच बसला. रंगमंचावरील मोडक्या लाकडी फळ्या, फ्लोरिंगला पडलेल्या भेगा, मेक-अप रूममधील अस्वच्छता आणि दुर्गंधीनं त्यांची सगळ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. न राहावल्याने सुमीतनं तातडीने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून हे विदारक दृश्य सर्वांसमोर आणले.
हे नाट्यगृह औरंगाबाद महानगरपालिकेचं असून तिथे शिवसेनेची सत्ता आहे. रंगमंदिराच्या दुरावस्थेचे फेसबुक लाईव्ह करताना सुमीतने सत्ताधारी शिवसेनेला चिमटे काढले आहेत. आता शिवसेना या टीकेची दखल घेते? की यावर काही प्रतिक्रीया देते हे येणाऱ्या काळात कळेलच.