पुणे  :  राज्यात पुन्हा बैलगाडा शर्यत सुरू होणार असल्याचा निर्णय येताच जोरदार जल्लोषाला सुरुवात झालीय. गावोगावी शेतकऱ्यांनी गुलाल, भंडाऱ्याची उधळण करत जल्लोष केला. बारामती, सातारा, कोल्हापूर, रांजणगाव, जुन्नर, शिरुर, पिंपरी-चिंचवडमधल्या शेतकऱ्यांनी फटाके वाजवत, गुलालाची, भंडाऱ्याची उधळण करत एकमेकांना मिठाई भरवली. तर शर्यतीत धावणाऱ्या बैलालाही भाकर तुकडा आणि मिठाई भरवण्यात आली. बैलांना ओवाळण्यात आलं.  महाराष्ट्रात सात वर्षांनी पुन्हा भिर्रर्रचा नाद घुमणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात बैलगाडा शर्यत सुरु व्हावी यासाठी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. यासाठी आढळराव पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिल्यानंतर आढळराव पाटील यांनी ही आनंदाची गोष्ट आहे, माझा कानावर अजूनही विश्वास बसत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.


गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग आणि आम्ही या निर्णयाची आतुरतेने वाट पहात होतो, बैलगाडा शर्यतीचा मी खंदा पुरस्कर्ता राहिलो आहे, याआधी अनेकवेळा न्यायालयात लढे दिले, पण दुर्देवाने २०१४ मध्ये बैलगाडा शर्यती बंद पडल्या, आज सर्वांच्या प्रयत्नातून राज्यात पुन्हा बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाली आहे. शेतकऱ्याच्या जीवनात आनंद देणारी ही खूप मोठी घटना आहे, असं आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे.  यावेळी आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे विशेष आभार मानले.  



काल कोर्टात २ तास युक्तीवाद झाला, राज्य शासनाने योग्य प्रकारे आबली बाजू मांडली. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये  बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यात आली आहे मग महाराष्ट्रात का नाही या मुद्द्यावर चर्चा झाली, सुप्रीम कोर्टाने चांगला निर्णय दिला अशी प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली आहे.


खासदार अमोल कोल्हे यांना टोला
बैलगाडा शर्यतीवरून माजी आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांना टोला लगावला आहे. बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी मिळाली खरी पण याचं श्रेय जनतेने ठरवावं,  श्रेय घ्यायला बाकीचे पुढे येतील पण मी मागे राहणार आहे, हे शेतकऱ्यांचं श्रेय आहे, राज्य शासनाचं हे खरं श्रेय आहे अशा शब्दात आढळराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.