भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकपच्या (T20 World Cup) अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव करत इतिहास रचला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला आहे. या विजयानंतर संपूर्ण जगभरात भारतीय संघाची चर्चा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्वच राजकारण्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान भारतीय संघाच्या विजयानंतर आता राजकीय वक्तव्यांमध्येही त्याचा दाखला दिला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेची मॅच महायुती जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी त्यांना टोला लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"विधानसभेचा आमचा खेळही भारतीय संघाप्रमाणे असेल. विधानसभेची मॅच आमची महायुती जिंकेल. त्यादिशेने आम्ही अग्रेसर झालो आहोत," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यावर आदित्य ठाकरे यांनी टोला लगावला असून काही लोक प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत असतात. हा बालिशपणा आहे अशी टीका केली आहे. 


"काही लोक प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत असतात. हा बालिशपणा आहे. काल भारत देश, इंडिया जिंकला आहे. सगळी 100 कोटी लोक आपण जिंकलो आहेत. खासकरुन राहुल द्रविड यांनी भावना दाखवल्या तेव्हा मला फार बरं वाटलं. आम्ही त्यांना पाहत मोठे झालो आहोत. त्यांनी वर्ल्डकप उचलला ते पाहून बरं वाटलं," असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. 


भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी तडाखेबंद फलंदाजी करत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली होती. अखेरच्या क्षणी दक्षिण आफ्रिकेला 30 चेंडूत 30 धावांची गरज होती. पण हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीपने जबरदस्त गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी धूळ चारली. 


जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या यांच्या गोलंदाजीसह सूर्यकुमार यादव यानेही जबरदस्त झेल घेतल विजयात मोलाचा वाटा उचलला. तसंच विराट कोहलीने 76 धावांची खेळी करत भारतीय फलंदाजीत मोठं योगदान दिलं. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार मार्कराम यानेही सामन्यानंतर भारतीय संघाचं कौतुक केलं. "हा क्रिकेटचा पहिलाच सामना नाही, जेव्हा संघाला 30 चेंडूत 30 धावांची गरज होती. भारताने चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण करत संघाला मजबूत स्थितीत नेलं," असं त्याने म्हटलं.