आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ; दिशा सालियन मृत्यूप्रकरणी SIT चौकशी होणार
दिशा सालियन मृत्यूप्रकरण अखेर एसआयटीची स्थापना झाली आहे. मुंबईतील तीन पोलीस अधिका-यांचा या चौकशी समितीत समावेश आहे.
Disha Salian Case SIT Enquiry Aditya Thackeray: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंसंदर्भातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंची SIT चौकशी होणार आहे. त्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या एसआयटी समितीमध्ये अपर पोलीस आयुक्त राजीव जैन, उपायुक्त अजय बंसल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांचा समावेश आहे. याप्रकरणावरून भाजप आमदार नितेश राणेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. आदित्य ठाकरे आणि मला समोरासमोर बोलवा असं आवाहन त्यांनी दिलंय. तर एसआयटी लावायची असेल तर लावा आम्ही देखील आमच्याकडची माहिती उघड करू अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.
राज्य सरकाने दिले होते एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश
राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश देण्यात आले होते. दिशा सालियनच्या मृत्यूवेळी आदित्य ठाकरे नेमके कुठे होते? असा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात आला होता त्याप्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी करण्याची मागणीही वेळोवेळी करण्यात आली होती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या मागच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिलेत.
ठाकेर कुटुंबाला घेरण्याची सरकारची तयारी
दिशा सालियन मृत्यू प्रकरण आदित्य ठाकरेंची पाठ सोडायला तयार नाही. दिशा सालियनच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंची SIT चौकशी होणार आहे. दिशाच्या मृत्यूवेळी आदित्य ठाकरे नेमके कुठे होते, याची चौकशी केली जाणाराय.. या चौकशीच्या निमित्तानं थेट ठाकरे कुटुंबालाच घेरण्याची तयारी सरकारनं केली आहे.
काय आहे दिशा सालियन मृत्यू प्रकरण
दिशा सालियन ही दिवगंत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची तत्कालीन मॅनेजर होती. 8 जून 2020 रोजी मालाडमधील राहत्या घरी 14व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला. एका पार्टीत दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सीबीआय चौकशी झाली. मात्र दारूच्या नशेत ती तोल जाऊन पडल्याचं सीबीआय अहवालात सांगण्यात आलं. तरीही दिशाची हत्या झाल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी वारंवार केला. तेव्हा दिशा मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी 22 डिसेंबर 2022 रोजी हिवाळी अधिवेशनात केली.
आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप
या एसआयटी चौकशीवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केलाय. तर चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही, अशा शब्दांत शिवसेना शिंदे गटानं पलटवार केलाय.
आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी
दिशा सालियनचा खून झाल्याचा सनसनाटी आरोप राणे पितापुत्रांनी वारंवार केला. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनीही चौकशीची मागणी लावून धरली. आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणीही करण्यात आली.