तिवरे धरण फुटण्यास प्रशासन जबाबदार, तक्रार करुनही दुर्लक्ष
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मध्यरात्री फुटल्याने मोठा हाहाकार माजला आहे.
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मध्यरात्री फुटल्याने मोठा हाहाकार माजला आहे. गाढ झोपेत गाव असताना धरण फुटल्याने एक गाव गुराढोऱ्यांसह वाहून गेले आहे. २४ बेपत्ता लोकांपैकी दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. दरम्यान, या धरण फुटीला प्रशासनाचा बेजबादारपणा कारणीभूत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. धरणाला भगदाड पडल्याची तक्रार ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही मोठी दुर्घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या धरणाला भगदाड पडले होते आणि त्याच भगदाडामुळे हे धरण फुटल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. धरणाला भगदाड पडल्याची तक्रार स्थानिकांनी प्रशासनाकडे केली होती मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
तिवरे धरण फुटल्याने हाहाकार, १३ घरे पाण्याखाली तर २४ जण बेपत्ता
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील किमान सात गावे पाण्याखाली गेली आहेत. या घटनेने परिसरात हाहाकार माजला आहे. मंगळवारी रात्री हे धरण फुटले. रात्र असल्याने आणि त्यात मुसळधार पाऊस असल्याने याची धरण फुटल्याची कल्पना गावकऱ्यांना आली नाही. मात्र, अचानक वाडीवस्तीत पाणी कसे घुसले याची माहिती घेण्याचा काही ग्रामस्थांनी प्रयत्न केला असता धरण फुटल्याचे समजले. तोपर्यंत उशीर झाला होता. धरण पाण्याच्या पुरात अनेक घरे वाहून गेली होती. तर अनेक जण पुराच्या पाण्यात बेपत्ता झाले. गावावर रात्रीच शोककळा पसरली होती.
मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे तिवरे धरणात मोठा पाणीसाठा झाला होता. रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास तिवरे धरण भरून वाहू लागले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. दरम्यान, त्याचवेळी धरणाला भगदाड पडत असल्याचे लक्षात आल्याने स्थानिक तलाठ्यांनी गावकऱ्यांना खबरदारीचा इशारा दिला.
ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे यासह सात गावांमध्ये पाणी घुसण्यास सुरुवात झाली. स्थानिकांशी संपर्क साधला असता त्यांनी किमान २४ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली आहे. पाण्याचा प्रचंड वेग असल्याने काही घरेही वाहून गेलीत.