योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिक शहरातील पाथर्डी परिसरात दुधात रबर आणि प्लास्टिक सदृश्य भेसळ करण्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. दूध तापवले असता साय सारखा दिसणारा हा पदार्थ पांढऱ्या रबरासारखा दिसून आला. त्यामुळे नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ होत असल्याचं समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथम दर्शनीस ही दुधातील साय असल्याचं वाटेल, पण जेव्हा ती हातात घेतली तर ती रबर सदृश्य किंवा प्लास्टिक सारखी वाटते. युरिया आणि साबुदाणा यांच्या मिश्रणातून तयार होत असलेलं हे दूध आजकाल नाशिक शहरामध्ये वितरीत केले जाते. हे करताना शेवटचं उरलेलं दूध विकत घेतलं जातं आणि त्यात शेवटचं उरलेलं मिश्रण अधिक स्वरूपात आल्यानं हा प्रकार दूध तापवल्यावर लक्षात आला आहे. असा प्रकार नेहमीच होतो. मात्र आज हे मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. सिंग कुटुंबाच्या हे लक्षात आलं. दूध पिल्यानंतर डोके दुखणे, चक्कर येणे असा त्रास सुरू झाला.


तक्रार केल्यानंतर सुरुवातीला अन्नभेसळ अधिकाऱ्यांनी याकडे प्रथम दुर्लक्ष केले. या भेसळीबाबत शहरात चित्रफीत व्हायरल झाल्यानं भेसळ प्रतिबंधक विभागानं याकडे तातडीने कारवाई केली. अल्प प्रमाणात झालेली ही भेसळ प्रत्येक घरात होत असल्याचा संशय आहे. अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत पूर्ण चौकशी अहवाल आल्यानंतरच प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट केले. दूधातली ही भेसळ जास्त प्रमाणात झाल्यामुळे हे आपल्या निदर्शनास आले आहे. अन्यथा कमी प्रमाणात केलेली भेसळ ही साईच्या स्वरूपात प्रत्येकाच्या पोटात जाते. त्यामुळे प्रत्येकाने आता आपल्या घरामध्ये खबरदारी घेण्याची गरज आहे.


हिना सिंग यांनी म्हटलं की, 'सुरुवातीला डोकं दुखायला लागलं. त्यानंतर त्यांना मळमळ होऊ लागली. संपूर्ण रात्र मी अस्वस्थ होती.' त्यांचे पती रामधर सिंग यांनी म्हटलं की, 'हे दूध तातडीने मी अन्न आणि औषध प्रशासनाकडे नेलं आणि याबाबत तक्रार केली.' शेजारी राहणाऱ्या ज्योती निकम यांना देखील हे दूध पाहून धक्का बसला. 


या अशा भेसळीमुळे मुलांना कर्करोग होऊ शकतो त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे.