उज्ज्वल निकम राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या रिंगणात?
उज्ज्वल निकम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार जोर लावत आहेत.
मुंबई: प्रसिद्ध वकील अॅडव्होकेट उज्ज्वल निकम आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवतील, असे सांगितले जात आहे. मुंबईत शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी निश्चित करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. तेव्हा जळगाव लोकसभा मतदारसंघातून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. उज्ज्वल निकम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार जोर लावत आहेत. मात्र, निकम यांच्याशी चर्चा करून आणि त्यांची सहमती घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. उज्ज्वल निकम हे महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित आणि वजनदार वकील आहेत. मुंबईतील १९९३चं बॉम्बस्फोट प्रकरण, २६/११ दहशतवादी हल्ला, कोपर्डी बलात्कार प्रकरण, शक्ती मिल बलात्कार प्रकरण यासारख्या हाय-प्रोफाइल खटल्यांच्या निकालात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यामुळे निकम यांना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ शकतो. सध्या भाजपचे अशोक पाटील जळगाव मतदारसंघाचे खासदार आहेत. ते दोन वेळा याच मतदार संघातून निवडून आले आहेत.
तत्पूर्वी शुक्रवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीकडून लोकसभा उमेदवारीसाठी काही नावे निश्चितही करण्यात आली. त्यानुसार रायगडमधून सुनील तटकरे तर कोल्हापूरमधून धनंजय महाडिक लोकसभेची निवडणूक लढवतील. राष्ट्रवादीकडून राज्यातील अन्य मतदारसंघातील उमेदवारांचीही चाचपणी करण्यात आली. त्यानुसार उस्मानाबादमधून माजी मंत्री दिलीप सोपल, पद्मसिंह पाटील आणि राणाजगजितसिंह पाटील यांची नावे चर्चेत आहेत. तर बीडमधून जयदत्त क्षीरसागर, अमरसिंह पंडित आणि बजरंग सोनवणे यांच्या नावाचा विचार सुरु आहेत. परभणी मतदारसंघातील उमेदवारीसाठी बाबाजानी दुर्राणी आणि विजय भांबळे यांच्यात चुरस आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादीचे केवळ चार उमेदवार निवडून आले होते.