पुणे : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या मालमत्तेवर सीबीआयने आज छापा टाकला. त्यासोबतच देशमुख यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणी वसुलीचे आरोप लावले होते. त्याप्रकरणी सीबीआय चौकशी सुरू होती. यावर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. तसेच शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परबांवरही कारवाईची त्यांनी मागणी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अनिल देशमुख यांच्यावर कारवाई ही कायदेशीररित्या सुरू आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना काहीही कळत नाही. ते विनाकारण भाजपवर आरोप करतात. सीबीआय न्यायालयाच्या आदेशानुसार काम करीत आहे. परमेश्वर सर्वांचा हिशोब करेन.' असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.


'सचिन वाझेने आपल्या पत्रात मंत्री अनिल परबांचाही उल्लेख केला होता. त्यामुळे अनिल परब आणि दर्शन घोडावद यांचीही सरकारने चौकशी केली पाहिजे. तसेच शिवसेनेच्या संजय राऊत यांच्यावरही एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. त्यांचीही केंद्रीय महिला आयोगाने चौकशी करायला हवी. त्यामुळे काही जण सुपात आहेत, काही जण जात्यात आहेत'. अशी प्रतिक्रीया चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली आहे.