प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोरोना महामारीनंतर अनेक महिन्यांनंतर शाळेची घंटा पुन्हा वाजली. मात्र अजब करणारी गोष्ट म्हणजे शाळेत विद्यार्थी आले पण चकित करणारी बाब म्हणजे शिक्षकांनीच शाळेला दांडी मारली. दरम्यान कोल्हापूरमध्ये बऱ्याच महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा मुलांच्या शाळा सुरू झाल्यात... पण एका गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत वेगळीच अडचण विद्यार्थी-पालकांसमोर आली. विद्यार्थी शाळेत आले, शिक्षक मात्र घरातच राहिले. त्यामुळे शिक्षकांमुळं पालक संतापले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळं बंद पडलेल्या शाळा गेल्या शनिवारपासून पुन्हा सुरू झाल्या. मुलांच्या किलबिलाटानं शाळा पुन्हा नव्याने गजबजून गेल्या. पण करवीर तालुक्यातील गिरगावच्या जिल्हा परिषद शाळेत भलताच प्रकार घडला. विद्यार्थी शाळेत पोहोचले, पण त्यांना शिकवणारे शिक्षकच गैरहजर होते.



सकाळी साडे सात वाजता शाळा भरली, पण एकही शिक्षक शाळेत उपस्थित नव्हता. त्यामुळं पालकांच्या संतापाचा बांध फुटला... शाळेला दांडी मारणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली. पालकांच्या संतापानंतर शिक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन शनिवारच्या घटनेची माहिती घेतली. 


पालकांसह विद्यार्थ्यांचीही मते जाणून घेण्यात आली. त्या आधारे चौकशी अहवाल तयार करण्यात आलाय.. गट शिक्षणाधिकारी या प्रकरणी दोषी शिक्षकांवर काय कारवाई करणार याकडं सगळ्याचं लक्ष लागलं आहे.