सोलापूर : सोलापूरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापुरातील बुधवार पेठ इथल्या राकेश मोरे या 20 वर्षांच्या युवकावर गेल्या चार दिवसांपासून सिव्हिल हॉस्पीटलमध्ये टीबी आजारावर उपचार सुरु होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण काल दुपारी राकेशचं निधन झाल्याची माहिती डॉक्टारांनी राकेशाच्या नातेवाईकांनी दिली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना धक्कादायक प्रकार दिसला.


मृत राकेशच्या संपूर्ण शरीराला मुंग्या लागल्या होत्या. हा प्रकार कुटुंबियांना जबरदस्त धक्का बसला. राकेशच्या मृत्यूस सिव्हिल हॉस्पिटल मधील डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप राकेशच्या नातेवाईकांनी केला आहे.


तर उपचारात कोणताही हलगर्जीपणा झाला नसल्याचं स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनानं दिलं आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्ण गंभीर असल्याची कल्पना देण्यात आलेली होती. मृत्यू झाल्याचे सांगितल्यानंतर गाडी आणण्याचे कारण सांगून नातेवाईक निघून गेले. संध्याकाळपर्यंत शव हे जनरल वार्डातच होतं. 


रुग्णाला नाकाद्वारे दूध दिले जातं होते. तसंच सलाईनमध्ये देखील साखरेचे प्रमाण असतं. नातेवाईकांनी दिरंगाई केल्याने तसेच काही प्रमाणात अस्वच्छता असल्याने हा प्रकार घडला असल्याची शक्यता असल्याचे स्पष्टीकरण रुग्णालयाच्या वतीने देण्यात आलं आहे. 


दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. तसंच यापूढे मृत व्यक्तीचे शव हे अर्धा तासापेक्षा जास्त काळ वार्डात राहणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असे स्पष्टीकरण प्रभारी अधिष्ठाता डॉ. शाकिरा सावस्कर यांनी दिली आहे.