निलेश खरमरे, झी २४ तास, पुणे : आता बातमी आहे शाळेतील एका घंटेची. पुण्यातील माध्यमिक विद्यालयात मुलांसाठी अनोखा 'वॉटर बेल' (Water Bell) हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे अनेक आजार दूर होण्यास मदत होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. काय आहे हा उपक्रम पाहुयात या बातमीमधून.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाळेची घंटा विविध कारणांसाठी वाजवली जाते. शाळा भरल्यावर, तास संपल्यावर आणि शाळा सुटल्यावर ही घंटा वाजवली जाते. पण याशाळेत आणखी एका कारणामुळे घंटा वाजवली जाते.  पण ही नुसती घंटा नाही तर ही आहे वॉटर बेल. 


आता वॉटर बेल म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न पडला असेल. पुण्याच्या माध्यमिक विद्यालय एरंडवणे शाळेत अशी एक घंटा वाजली, की सर्व विद्यार्थी आपल्या बॅगेतून पाण्याची बाटली बाहेर काढतात आणि एकाचवेळी पाणी पितात. शाळेतील ही घंटा दोन वेळा वाजते नऊ आणि साडे अकराच्या ठोक्यावर.


विद्यार्थ्यांवर असलेला ताण-तणाव, शिक्षकांची भीती यातून विद्यार्थ्यांचं पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होत असतं. परिणामी विदयार्थ्यांना अनेक आजार जडण्याची भीती उद्भवते. त्यावर तोडगा म्हणून 'वॉटर बेल' ही संकल्पना सुरू करण्यात आलीय. असाच उपक्रम केरळ राज्यातील शाळेमध्येही राबविण्यात आला आहे. 


या 'वॉटर बेल'चा चांगला परिणाम विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत असल्याचं दिसत आहे. या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि आरोग्याचे उत्तम धडे मिळताना दिसत आहेत. तेव्हा हा उपक्रमाचं अनुकरण राज्यातील इतर शाळांनीही करायला हरकत नाही. या उपक्रमाला केरळमधील एका शाळेपासून झाली आता कर्नाटक राज्यातही असा उपक्रम राबवला जातो.