नवऱ्याचा खून करून पत्नीने मृतदेह शेतात गाडला
२० दिवसांनंतर खुनाचे बिंग फुटले
मयुर निकम, बुलढाणा : पत्नीने तिच्या नवऱ्याच्या खुनाचा प्रियकराच्या मदतीने कट रचला. चौघांनी मिळून निर्घृणपणे खून केला आणि मृतदेह शेतात नेऊन पुरला. पती बेपत्ता असल्याचं नाटक करून पोलिसांत तक्रारही केली. पण पोलिसांनी शोध घेताना अखेर बिंग फुटलं आणि या खुनाचा उलगडा झाला.
बुलढाण्यातील सागवन परिसरातील गायनंबर येथे हा धक्कादायक प्रकार घडला. गणेश सरोजकर हा नेहमी त्याच्या पत्नीला मारहाण करत असे. गणेशच्या त्रासाला कंटाळलेल्या त्याच्या पत्नीचे शेजारच्या तरुणाबरोबर प्रेमसंबंध जुळले. गणेशला याबाबत माहिती कळल्यानंतर तो पत्नी आणि तिच्या प्रियकराला जीवे मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे त्या दोघांनी मिळून गणेशलाच संपवण्याचा कट रचला.
दोघांनी रचलेल्या कटानुसार गणेशला विष मिसळून भरपूर दारू पाजण्यात आली. पण तेवढ्याने तो मरेल असे वाटले नाही तेव्हा गणेशची पत्नी, तिचा प्रियकर आणि अन्य दोन साथीदार यांनी मिळून त्याला फाशी देऊन मारले आणि त्याचे प्रेत शेतात पुरून टाकले.
गणेश बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी तपास सुरु केला आणि २० दिवसांनी अखेर या खुनाचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी या सगळ्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली आणि आवळखेड शिवारातील शेतात मृतदेह पुरल्याची माहिती दिली.
पोलिसांनी तपास पथक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांसह शेतात पुरलेलं कुजलेल्या अवस्थेतील प्रेत बाहेर काढून पंचनामा केला आणि गणेश सरोजकरची पत्नी, तिचा प्रियकर आणि अन्य दोन आरोपींना बेड्या ठोकल्या.
बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला.