लोणावळा दुर्घटनेनंतर आता भीमाशंकर वनविभागाचा मोठा निर्णय; `या` पर्यटनस्थळांवर बंदी
Lonavala Bhushi Dam Accident: लोणावळ्यात झालेल्या दुर्घटनेनंतर आता भीमाशंकर वनविभागाने मोठा निर्णय घेतला आहे.
Lonavala Bhushi Dam Accident: मान्सून सुरू झाला आहे. अशावेळी पर्यटकांची पावलं आपसूकच निसर्गरम्य पर्यटनस्थळांकडे वळतात. मात्र, पर्यटनस्थळांवर कमालीचं धाडस पर्यटकांच्या जीवावर बेतू शकते. अलीकडेच लोणावळा येथील दुर्घटनेनंतर हे स्पष्टदेखील झाले आहे. लोणावळा येथे वर्षासहलीसाठी गेलेल्या कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. लोणावळा दुर्घटनेनंतर भीमाशंकर वनविभागाने मोठा निर्णय घेतला आहे. पर्यटकांचे अपघात व दुर्घटना होऊ नये यासाठी काही स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे.
भिमाशंकर वन्यजीव अभयारण्यात पावसामुळे निसरड्या झालेल्या वाटांवर अपघात होण्याचा धोका लक्षात घेत वन्यजीव विभागातर्फे १ जुलै २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पर्यटकांना अनेक पर्यटन स्थळावर बंदी घालण्यात आली आहे. भिमाशंकर येथे दरवर्षी हजारो लोक ट्रॅकिंग किंवा सहलीसाठी जात असतात. त्यामुळंच वन विभागाने हा निर्णय घेतला आहे.
भीमाशंकर अभयारण्यात अनेक धबधबे आहेत, त्या कुंडांमधील पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज पर्यटकांना येत नाही,त्यामुळे अपघात होण्याच्या अनेक घटना घडतात याच अनुशंगाने खबरदारीचा उपाय वनविभागाने घेतला आहे. वनविभागाने कोंढवळ धबधबा, चोंडीचा धबधबा-खोपीवली क्षेत्र, न्हाणीचा धबधबा-पदरवाडीजवळ, सुभेदार धबधबा-नारीवाली क्षेत्र, घोंगळ घाट नाला-खांडस ते भीमाशंकर मार्ग, शिडी घाट-पदरवाडी ते काठेवाडी हे सर्व पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळं वर्षा सहलीसाठी घराबाहेर पडताना ही माहिती करुन घ्याच.
लोणावळा दुर्घटना कशी घडली?
वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल येथे हे अन्सारी कुटुंब गेले होते. रेल्वेचा वॉटर फॉल म्हणूनही या जागेला ओळखलं जातं. हे पाणी तिथून भुशी धरणात येते. अन्सारी कुटुंबातील एकूण 10 जण लोणावळा येथे फिरण्यासाठी आले होते. वॉटरफॉलच्या एका घडकावर उभे असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. मुसळधार पाऊस झाल्यामुळं अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. अचानक वाढलेल्या पावसामुळं एक महिला, दोन मुली आणि दोन लहान मुलं खडकावर अडकले. दुर्दैवाने पाण्याच्या प्रवाहात पाचही जण वाहून गेले. पाचही जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.
लोणावळ्यासाठी नियमावली जाहीर
लोणावळा दुर्घटनेनंतर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. संध्याकाळी सहा नंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आले आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही बडगा उगारला जाणार आहे. असं पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी जाहीर केलंय.