नागपूर : वर्षभरापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातल्या नरभक्षक ठरवलेल्या अवनीला ठार करण्यात आलं. यवतमाळ जिल्ह्यातील बोराटी गावाजवळ २ नोव्हेंबर २०१८ला तिला ठार मारण्यात आलं. मात्र तिला ठार मारताना नवाब शाफत अली आणि त्याचा मुलगा असगर यांनी नियमांचा भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला. तेव्हापासून व्याघ्र रक्षणासाठी सुरु झालेली मोहीम आजही संपलेली नाही. अवनीच्या हत्येचा निषेध करत देश आणि विदेशातील २० शहरांत अवनीला श्रद्धांजली वाहण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे यवतमाळच्या राळेगाव परिसरात अवनी वाघिणीने १३ जणांचे बळी घेतले होते. बळी घेणाऱ्या टी वन वाघिणीला ठार मारणाऱ्या, नवाब असगर अली आणि नवाब शाफत अली खान यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला. वाघिणीला मारल्यापासून हा परिसर वाघाच्या दहशतीतून मुक्त झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.


अवनीच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झालं. मात्र वन्यजीव आणि मानवी संघर्षाची ही कहाणी इथंच संपलेली नाही. योगायोग म्हणजे आजच हिंगोलीतील सुकळी गावात एका वाघानं शेतकऱ्यावर आणि त्याला वाचवणाऱ्या इतर चौघांनवर हल्ला करुन त्यांना जखमी केलं. जनावरांनाही या वाघानं आपलं भक्ष्य बनवलंय. 


  


मानवाचा जंगलात हस्तक्षेप वाढल्याने वन्यजीव भक्ष्यांच्या शोधात मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत. वाघाच्या दहशतीतून सुटका करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या वाघाचा कसा बंदोबस्त करायचा याकडे वनविभागाने लक्ष्य केंद्रीत केलं आहे. अशात या वाघाचीही अवनी होऊ नये ही अपेक्षा.