मुंबई : राष्ट्रवादीमधून सचिन अहिर यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. दरम्यान असे असले तरी अहिर यांचा शिवसेना पक्षप्रवेश युवासेनाप्रमुख आणि नेते आदित्य ठाकरे यांच्या पथ्यावर पडला असल्याचं सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण आदित्य ठाकरे यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरु केली आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरेंचा चेहरा देण्यात आला आहे. सोबतच आदित्य यांनी स्वत: महाराष्ट्रात जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेसोबत संपर्काला सुरुवात केली आहे.


वरळी हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यात आता सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याने, शिवसेनेची वरळीतील ताकद दुप्पट वाढली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे शिवडी, माहिम, वरळी यापैकी कोणत्याही एका मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा मध्यंतरी होती. 


काही दिवसांपूर्वी वरळी आणि माहिम मतदारसंघातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत आदित्य ठाकरे यांची बैठक पार पडली होती. विशेष म्हणजे या बैठकीला वरळीचे विद्यमान आमदार सुनील शिंदे आणि माहिमचे आमदार सदा सरवणकर हे देखील उपस्थित होते. यामुळे आता आदित्य ठाकरे वरळीमधून विधानसभा निवडणूक लढवतील अशा चर्चांना उधाण आले आहे.