सांगली : तासगाव तालुक्यातील बलगवडे येथील एका रस्त्याच्या कडेला सहा महिन्यांची लहान बालिका आढळून आली. कुणी अज्ञाताने त्या 'नकोशी' ला गटारीत फेकले होते. पहाटे 6 च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बलगवडे गावातील काही लोक पहाटे तासगाव - भिवघाट रस्त्यावर व्यायामासाठी गेले असता त्यांना रस्त्याच्या कडेला एक लहान बाळ रडत असल्याचा आवाज आला. त्या गावकऱ्यांनी रडण्याच्या आवाजाच्या दिशेनं पाहणी केली. त्यावेळी त्यांना कपड्यात गुंडाळलेली एक सहा महिन्यांची मुलगी दिसली. 


गावचे रहिवाशी अरविंद पाटील यांनी या घटनेची रघुनाथ पाटील, राजेंद्र रास्ते, सूरज शिंदे यांना दिली. त्यांनी तेथे धाव घेऊन त्या बालिकेला ताब्यात घेतले. त्यांनी याबाबत तासगाव पोलिसांत नोंद केल्यांनतर पोलिसांनी त्या मुलीस सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. 


त्या 'नकोशा' झालेल्या मुलीला गटारीत फेकल्यामुळे तिच्या तोंडाला छोटी जखम झाली होती. तसेच, तिला गुंडाळण्यात आलेले कपडे गवताचे  कूसळ आणि धुळीने माखले होते. गावकरी महिला शुभांगी मोहिते, हेमलता जगताप यांनी त्या मुलीचे कपडे बदलले. त्या नकोशा बाळास दूध, पाणी पाजले. कोणी आपल्या लहान बाळाचे कपडे आणून दिले. कुणाला तरी नकोशा झालेल्या त्या मुलीला त्या गावकऱ्यांनी आपलीशी केले.