परीक्षेच्या ऑनलाइन- ऑफलाईन गोंधळात अंध विद्यार्थ्यांचा संभ्रम
अंध विद्यार्थ्यांपुढे अनेक प्रश्न ....
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे महाराष्ट्र राज्य शासनाने निश्चित केले आणि प्रत्येक विद्यापीठाला परीक्षा घेण्यासाठी सांगण्यात आले. हे करत असताना शासनाने परीक्षा कशा घ्यायच्या, याबाबचा निर्णय विद्यापीठानं घ्यावा असे सांगण्यात आले. याबाबत विद्यापीठांनी आपले निर्णयही घेतले. पुणे विद्यापीठाने निर्णय घेत असताना विद्यार्थ्यांना दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिले.
खरंतर ही बाब स्वागतार्ह आहे. परंतु खऱ्या अर्थाने या मुळेच, अंध विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत. पुणे विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय दिलेले आहेत. परंतु यामुळेच अंध विद्यार्थ्यांपुढे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत . याबाबतीत पहिला प्रश्न हाच आहे की, परीक्षा ऑनलाइन द्यायच्या की ऑफलाइन?
जर परीक्षा ऑनलाइन दिल्या, तर आपल्याला लेखनिक उपलब्ध होणार आहेत का? आपल्याला वीस मिनिटांचा वेळ अधिकतम मिळणार आहे का? किंवा ऑनलाइन परीक्षा आपण स्वतंत्र पद्धतीने देऊ शकणार आहोत का? तसेच या परीक्षा आम्ही स्वतंत्र पद्धतीने देऊ शकत असू तर, अंध विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ accessible website किंवा परीक्षा देण्याचे कुठलेही ऑनलाइन माध्यम accessible असेल की नाही हा सुद्धा त्यांच्यापुढे येणारा एक प्रश्नच आहे.
अशा ऑनलाईन परीक्षेच्या बाबत अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या सोबत अजूनही आहेत. आणि ऑफलाईन परीक्षेच्या संदर्भात सांगायचे झाल्यास ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेचा पर्याय निवडलेला आहे त्यांच्यासमोर आपण कुठे राहणार किंवा पुण्यामध्ये जाऊन कशी परीक्षा देणार ? परीक्षा स्थळी आपण पोहोचल्यावर आपल्याला लेखनिक उपलब्ध होतील का ? असे अनेक प्रश्न अंध विद्यार्थ्यांसमोर आहेत. लेखनिक विद्यार्थी आपापल्या परीने या लॉकडाऊनच्या परिस्थितीत मॅनेज तर करतीलच पण, राहण्याचा खूप मोठा प्रश्न अंध विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकणार आहे.