शशिकांत पाटील, झी मिडीया, लातूर: क्षुल्लक वादाचे पर्यावसन मोठ्या दंगलीत झाल्यामुळे औरंगाबाद शहरात मोठा हिंसाचार उफाळून आला. या हिंसाचारानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. मात्र, आता या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उडवली असून, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची तसेच, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. सरकारवर टीकेची तोफ डागताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यानी औरंगाबाद हिंसाचारामागे सत्ताधाऱ्यांचे राजकारण असल्याचा आरोप केलाय. तसंच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही मुंडेंनी केलीय. ते लातूरमध्ये बोलत होते. गृहखात्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.


पुरोगामी महाराष्ट्राला दंगली अशोभनीय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भीमा कोरेगाव येथील दोन समाजातील दंगल आणि आता औरंगाबादमध्ये दोन धर्मात झालेल्या दंगलीमागे सत्ताधाऱ्यांचे राजकारण असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. पुरोगामी महाराष्ट्राला अशा दंगली या शोभणाऱ्या नसून राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे राज्य आहे की नाही असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच कसलीही कुवत नसलेल्या राज्याच्या गृह खात्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगून राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली. ते लातूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.


दंगल प्रकरणाची सरकारने न्यायालयीन चौकशी करावी


औरंगाबाद मधील दोन दुर्दैवी असून यामुळे सरकारचा गुप्तचर विभाग फेल असल्याचेही ते यावेळी म्हणाले. त्यामुळे सरकारने या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी यावेळी धनंजय मुंडे यांनी केली आहे. याशिवाय औरंगाबाद मधील जनतेला कसल्याही अफवेवर विश्वास न ठेवता शांतता बाळगण्याचे आवाहनही त्यांनी केलं आहे.