Wardha Crime News :  एका 37 वर्षीय तरुणीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी घरातच मृतदेह पुरल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. वर्ध्याच्या सेवाग्राम येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मृत तरुणी मनोरुग्ण असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुरलेला मृतदेह बाहेर काढला. पोलिस तपासात धक्कादायक कारण समोर आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेवाग्राम येथील आदर्श नगर परिसरात ही घटना घडली आहे. ज्या घरात हा मृतदेह गेल्या दहा दिवसांपासून पुरण्यात आला आहे. प्रविणा साहेबराव भस्मे असे मृत तरुणीचे नाव आहे.  सेवाग्राम येथे आदर्श नगर येथे भस्मे कुटुंब राहते. या कुटुंबात आई, वडील, भाऊ आणि बहीण असे चार जण राहत. पण 37 वर्षीय प्रविणा साहेबराव भस्मे ही आधीपासूनच मनोरुग्ण असल्याने तिची प्रकृती चिंताजनक झाली होती. दरम्यान  3 जुलै ला रात्री 7. 30 ला तिचा मृत्यू झाला. परंतु परिसरात कुटुंबातील व्यक्तींशी कुणी बोलत नसल्याने अंत्यसंस्कार कसे करायचे अशीच परिस्थिती होती. घरची आर्थिक परिस्थिती देखील डामाडोल असल्याने अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्न कुटुंबासमोर असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. 


घरातच का पुरला मृतदेह


मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी 4 जुलै रोजी सकाळी 7. 30 च्या सुमारास वडील साहेबराव आणि भाऊ प्रशांत यांनी शेजाऱ्यांना कुठलीही खबर न लागू देता घरातच पहिल्या खोलीत चार ते पाच फूट खोल खड्डा करून प्रविणाचा मृतदेह त्यात पुरला.  या सर्व घटनेची माहिती गुप्तपणे सेवाग्राम पोलिसांना 13 जुलैच्या दुपारी मिळाली. पोलिसांनी हलचाली करित भावाला ताब्यात घेतले. भावाने घडेलेला प्रकार सांगितला. दहा दिवसांपूर्वीच राहत्या घरात मृतदेह पुरला असल्याची माहिती मिळताच याची माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आली. अखेर 13 जुलै गुरुवारच्या  रात्री 7 वाजता पुरलेला मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया करण्यात आली. तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार भागवत, मंडळ अधिकारी बारसागळे, तलाठी गुलशन पटले, कर्मचारी तडस या महसूल अधिकाऱ्यांच्या चमू समक्ष पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. सेवाग्राम रुग्णालयल येथील वैद्यकीय चमू आणि पोलीस प्रशासन यावेळी उपस्थित होते. मृतदेहाला दुर्गंधी सुटल्याने नागरिक हैराण झाले होते.