मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर आता धनगर समाज आक्रमक
मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर धनगर समाजही अधिक आक्रमक झाला आहे.
लातूर : मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर अन्य समाजही अधिक आक्रमक झाले आहेत. आम्हालाही आरक्षण हवे म्हणून त्यांनी आंदोलन करण्यात सुरुवात केली आहे. मराठा आरक्षानंतर लिंगायत समाजाच्या आरक्षणाची लगबग सुरू असताना आता धनगर समाजही आरक्षणासाठी आग्रही झाला आहे. धनगर समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयापुढे धनगर समाजाच्यावतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाच्यावेळी धनगर समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गातून अनुसूचित जमाती प्रवर्गात करण्याची मागणी करण्यात आली. निवडणुकीच्या तोंडावर धरनगर समाजाला न्याय दिला जाईल, असे सांगितले होते. मात्र, भाजप-शिवसेना सरकारने धनगर समाजाचा विश्वासात केला आहे. गेल्या पाच वर्षांपासून सरकार धनगर समाजाची फसवणूक करीत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. धरणे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी काळ्या फिती लावून धरणे आंदोलन केले.
राज्य सरकारने या आंदोलनाची दखल नाही घेतली तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या १२ ऑगस्ट या पुण्यतिथीला निलंगा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार, असा इशारा धनगर समाजाने दिला आहे. तसेच सरकारने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश केलाच नाही तर १ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. आंदोलकांनी उपजिल्हाधिकारी यांना एक निवेदनही दिले. या आंदोलनात निलंगा, शिरूर अनंतपाळ आणि देवणी तालुक्यातील नागरिक सहभागी झाले होते.