मुंबई : मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) आणि शिवसेनेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackery) हे एकत्र येण्याची चर्चा सध्या सुरु आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे दोघे भाऊ पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र पुन्हा दोन्ही ठाकरे एकमेकांच्या विरुद्ध आमने सामने येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यव्यापी 'महाप्रबोधन यात्रे'ला सुरुवात करणार आहेत. उद्धव ठाकरे येथील टेंभी नाका येथे पहिल्या जाहीर सभेला संबोधित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 


उद्धव ठाकरे यांनी याआधीच शिवसैनिकांना सक्रिय सहभागाने पक्षबांधण्याची मोहिम हाती घेतली आहे.  टेंभी नाक्याला महाराष्ट्राच्या राजकारणात खूप महत्त्वाचे स्थान आहे. हे तेच ठिकाण आहे जिथून एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांनी शिवसेनेच्या विकासासाठी काम केले. आता शिंदेंच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे टेंभी नाक्यावर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी पहिल्या सभेला संबोधित करणार आहेत.


तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा होताच आता राज ठाकरेही महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. राज ठाकरे मंगळवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. याच पत्रकार परिषदेत ते महाराष्ट्र दौऱ्याबद्दल घोषणा करण्याची शक्यता आहे. 


राज ठाकरे यांची हिपबोन शस्त्रक्रिया झाल्यावर पहिल्यांदाच त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची रवींद्र नाट्य मंदिरात बैठक घेतली. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. मंगळवारीही राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची पुन्हा बैठक घेणार आहेत. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार आहे.