Badlapur News : रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे नऊ महिन्याच्या चिमुरडीला भयानक त्रास सहन करावा लागला आहे.  लसीकरणानंतर इंजेक्शनची सुई तब्बल पाच महिने चिमुकलीच्या मांडीतच होती. बदलापूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शस्त्रक्रिया करुन या मुलीच्या मांडीत असलेली सुई काढण्यात आली. या प्रकारानंतर मुलीच्या पालकांनी संताप व्यक्त करत रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लसीकरण केल्यानंतर इंजेक्शनची सुई चिमुकलीच्या मांडीतच राहिली होती.  नवव्या महिन्यात  लसीकरण केल्यानंतर तब्बल पाच महिने इंजेक्शनची सुई चिमुकलीच्या मांडीतच अडकून होती. या प्रकरणी इंजेक्शन देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी चिमुकलीच्या आई-वडिलांनी केली आहे.


काय घडलं नेमकं?


अंबरनाथ मध्ये राहणारे विशाल बनसोडे यांनी मुलगी अद्विकाचं नवव्या महिन्यातील लसीकरण करण्यात आले. बदलापूरच्या दुबे रुग्णालयात बनसोडे यांनी मुलगी अद्विका हिला लस दिली. लसीकरण झाल्यानंतर काही दिवस तिच्या मांडीवर सूज होती. सूज उतरल्यानंतर पुढील पाच महिने अद्विकाला कोणताही त्रास झाला नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी ती सतत मांडी खाजवत असल्याचं बनसोडे दांपत्याच्या लक्षात आलं. मुलीला त्रास होत असल्याने त्यांनी तिला अंबरनाथच्या आशीर्वाद रुग्णालयात नेले.


एक्सरे पाहून डॉक्टरांना धक्का बसला


आशीर्वाद रुग्णालयात अद्विकाच्या विविध चाचण्या करण्यात आल्या.  रुग्णालयातील डॉक्टर मनोज कंदोई यांनी तिच्या मांडीचा एक्क्सरे केल्यानंतर मांडीत इंजेक्शनची सुई असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर तिचं ऑपरेशन करून मांडीतील सुई काढण्यात आली. ऑपरेशन केल्यानंतर अद्विकाच्या मांडीवर तीन टाके पडलेत. अद्विकाच्या मांडीतली सुई काढण्यात आली आहे. 


तब्बल पाच महिने इंजेक्शनची सुई अद्विकाच्या मांडीत


तब्बल पाच महिने इंजेक्शनची सुई अद्विकाच्या मांडीत होती. आता ऑपरेशन झाल्यानंतर तिला कोणताही धोका नसला तरी, या गंभीर प्रकाराची दखल घेऊन दुबे रुग्णालयातील संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बनसोडे दांपत्यानं केली आहे. तर या प्रकरणाची चौकशी केली जाईल जर कोणी दोषी आढळला तर त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल असं  दुबे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश अंकुश यांनी सांगितले आहे.