वृद्ध शेतकऱ्याची धगधगत्या चितेत उडी; सरणाशेजारील दिवा पाहून पोलिसही हादरले
Nagpur | नागपूरमधील किन्ही येथील वृद्ध शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून चितेत उडी घेऊन मृत्यूला कवटाळल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.
नागपूर : मंगळवारी महाशिवरात्रीला शंकराच्या दर्शनासाठी पहाटेपासून मंदिरावर रिघ लागली असताना कुही तालुक्यातील किन्ही येथील वृद्ध शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून चितेत उडी घेऊन मृत्यूला कवटाळल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. चितेत उडी घेण्यापूर्वी वृद्ध शेतकऱ्याने सरणाची मृत्यूपूर्वी विधिवत पूजा केल्याचे घटनास्थळी दिसून आले. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आत्माराम मोतीराम ठवकर (वय 80) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. ते येथील भारत गॅस कंपनीचे मालक चिंधू ठवकर यांचे वडील होते.
आत्माराम ठवकर सधन कुटुंबातील असून ते आध्यात्मिक प्रवृत्तीचे व वारकरी संप्रदायाचे होते. 2006 मध्ये त्यांच्या श्वसनलिकेवर शस्त्रक्रिया झाली होती. परंतु, हे दुखणे अजूनही सुरूच होते. माहितीनुसार, मृतकाच्या मुलाची गॅस गोडावूनलगत शेती आहे.
मृतकाने मृत्यूच्या रात्री गावात मंडईनिमित्त आयोजित नाटकाचा रात्रभर आनंद घेतला. पहाटे गावातील मंदिरात पूजा-अर्चा करून ते शेताकडे आले. शेतातील लाकडे गोळा करून सरण रचले. त्यावर तणस पसरवले. विड्याच्या पानावर दिवे लावून सरणाची पूजा केली. त्यानंतर सरण पेटवून चितेत उडी घेतली, असा संशय आहे. त्यांचा मृतदेह अर्धवट स्थितीत जळाल्याचे दिसून आले.
घटनेनंतर मुलासह नातेवाइकांनी घटनास्थळाकडे धाव घेत वेलतूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार आनंद कविराज यांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली. तत्काळ पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. पंचनामा दरम्यान, सरणावर अर्धवट मृतदेह व शेजारी पेटलेला दिवा आढळला. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नीतेश डोर्लीकर व शिपाई सुरपाम करीत आहे.
घरच्यांचा बोलण्यास नकार
वृद्ध शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर परिसरात अनेक तर्कविर्तक व्यक्त केले जात आहे. वृद्धाची कौटुंबिक परिस्थिती सधन असून कुटुंब उच्चशिक्षित आहे. मुलगा नागपुरात राहतो.
गॅस गोडावूनच्या कामामुळे सोमवार ते शनिवार मुलगा वडिलासोबत राहायचा. महाशिवरात्रीचा उत्सव असल्याने सर्व कुटुंब नागपूरवरून किन्ही येथे आले होते. या घटनेनंतर कुटुंबीयांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला आहे.