गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत
मुंबई : गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत, असे आदेश कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिलेत. कृषी, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे पंचनामे तातडीने करावेत असं फुंडकरांनी म्हटलंय.
जिल्हा प्रशासनाने विमा कंपन्यांची बैठक घेऊन गावनिहाय आकडेवारी त्यांना उपलब्ध करून द्यावी असे निर्देशही फुंडकरांनी दिलेत. तर राज्य सरकार गारपीटग्रस्त शेतक-यांच्या पाठिशी असून शेती नुकसान भरपाईसाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिलीय. गारपिटीत मृत्यूमुखी पडलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांना मदतीचं आश्वासन देशमुख यांनी दिलंय.
गारपिटीमुळे दोन शेतकऱ्यांचा मृत्यू
अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मराठवाडा आणि विदर्भातील शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. गारपिटीमुळे दोन शेतक-यांचा मृत्यू झालाय. जालनाच्या वंजाउमरद गावातील वृद्ध शेतक-याचा गारपिटीमुळे मृत्यू झालाय. नामदेव शिंदे असं मृत शेतक-याचं नाव आहे. गारपिटीमुळे शेतक-याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. जालन्यामध्येच साठ वर्षीय आसाकाम जगताप यांचाही मृत्यू झाल्याच समजतंय.
जालना जिल्ह्यात आज सकाळी मोठ्या प्रमाणात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. जालना शहर, रामनगर आणि अंबड, मंठा तालुक्यातील काही भागात ही गारपिट झाली.
गारपिटीमुळे अक्षरशः गारांचा खच
या गारपिटीमुळे अक्षरशः गारांचा खच सगळीकडे पाहायला मिळाला. अवकाळी पाऊस आणि गार पिटीमुळे रब्बी हंगामातील गहू, आणि ज्वारी या पिकाबरोबरच ढोबळी मिरची, टोमॅटो, द्राक्षांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील शेतकरी सध्या चिंतेत
सध्या अनेक भागात गहू आणि ज्वारी ही दोन पिकं सोंगणीच्या अवस्थेत आहे, तर काही भागात सोंगणी होऊन या पिकांची गंजी घालण्यात आलीय, अशातच अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यानं जालना जिल्ह्यातील शेतकरी सध्या चिंतेत आहे.