कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर: राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे मोठ्या संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे पंचनामे झाले नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर महसूलमत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला होता आणि पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यातला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकसानग्रस्त शेतीच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी एकरी 400 रुपये मागत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी इथला हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे. महसूल विभागानं नेमलेल्या पथकाकडून पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप इथल्या शेतक-यांनी केलाय. 



एका शेतकऱ्यानं हा सर्व प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. झी 24 तासनं या बातमीची दखल घेतल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. कृषिमंत्र्यांच्या आदेशानंतर नेवाशातील तिघांचं निलंबन करण्यात आलं आहे.