Ahmednagar Hospital Fire : `आमच्या मुलीला फक्त न्याय मिळवून द्या`
विशाखाच्या आई-वडिलांनी विशाखाची चूक काय असल्याचा सवाल केला आहे.
प्रशांत शर्मा, अहमदनगर, झी मीडिया : काही दिवसांपूर्वी अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात आग लागली होती. या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. तर या प्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करत डॉ. विशाखा शिंदे यांना अटक करण्यात आली. मात्र डॉ. शिंदे यांच्या अटकेनंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या. यावेळी विशाखाच्या आई-वडिलांनी देखील विशाखाची चूक काय असल्याचा सवाल केला आहे.
अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात लागलेल्या आगीमध्ये विशाखा शिंदे हिची काय चूक होती असा सवाल उपस्थित करत तिच्या समर्थनार्थ सोशल मीडियात पोस्ट व्हायरल होतायत. शिकाऊ डॉ. विशाखा शिंदे या सध्या अटकेत आहेत. मात्र तिच्यावर चुकीचा गुन्हा दाखल झाला असून एकीकडे शासन बेटी बचायो बेटी पढाओचा नारा देतात मात्र दुसरीकडे शिक्षण घेत असतानाच मुलीवर तिची चूक नसताना तिच्यावर जबाबदारी ढकलत गुन्हा दाखल कितपत योग्य आहे असं विशाखाच्या कुटुबीयांनी म्हटलंय.
"सर्वसामान्य विद्यार्थ्यांना यामध्ये पुढे केलं असून ही चुकीची बाब आहे. या प्रकरणाची दखल प्रशासनाने योग्य पद्धतीने घ्यावी. आमच्या मुलीला या प्रकरणात योग्य न्याय मिळवून द्यावा. विशाखावर लावलेला जो आरोप आहे तो सरकारने मागे घ्यावा अशी आमची विनंती आहे," असं मत विशाखाच्या वडिलांनी व्यक्त केलं आहे.
पाण्यावलेल्या डोळ्यांनी विशाखाची आई म्हणाली, "आमच्या मुलीला फक्त न्याय मिळवून द्यावा. तिच्यावर अन्याय झालेला आहे. त्यामुळे तिच्यावर झालेले आरोप मागे घेण्यात यावे आणि तिची निर्दोष मुक्तता करण्यात यावी."
ज्या दिवशी या रूग्णालयात आग लागली त्यावेळी डॉ. विशाखा या विभागात ड्युटीवर होत्या. या प्रकरणी कारवाई म्हणून त्या दिवशी ड्युटीवर असणाऱ्या काही नर्स आणि डॉ. विशाखा यांना दोषी ठरवलं गेलंय.