अहमदनगर: मिस्टर एशिया किताब पटकवणाऱ्या अहमदनगरच्या तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मिस्टर एशिया किताब पटकवणाऱ्या अजिंक्य गायकवाड याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना त्याच्या घरीच घडल्याची माहिती मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरात टीव्ही केबलमधील वीज प्रवाह उतरल्याने वीजेचा धक्का लागला आणि त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. टीव्ही व्यवस्थित दिसत नसल्याने अजिंक्य केबल काढून परत जोडण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र त्याचवेळी वीजेचा धक्का लागल्याने अनर्थ घडला. विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. 


अजिंक्य गायकवाडच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अजिंक्य वेगवेगळ्या खेळात निपुण होता. 2019 मध्ये त्याने मिस्टर वर्ल्ड स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्याच्या मृत्यूमुळे गायकवाड परिवारासह अजिंक्यचे मित्र आणि फॉलोवर्स यांना मोठा धक्का बसला आहे. महावितरण आणि केबल चालकांच्या हलगर्जीपणामुळे अजिंक्यचा मृत्यू झाला असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं. 


11 के व्ही ओव्हर हेड वायरवरून आलेल्या केबल टीव्ही वायरमधून हा वीजेचा करंट आला. हा करंट खूप मोठा होता त्यामुळे शॉक बसल्याने तो वायरला चिकटून राहिला. केबल चालकांच्या हलगर्जीपणामुळे अजिंक्यचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.