लैलेश बारगजे, झी 24 तास, अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात बोगस लष्कर भरतीचा प्रकार उघडकीस आलाय.  10 ते 12 युवकांकडून महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार,पंजाब, हरियाणा आणि नवी दिल्ली येथील शेकडो युवकांना लष्करात भरतीचे आमिष दाखवले जायचेय अशी फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा अहमदनगर भिंगार पोलीस आणि दक्षिण कमान मिलीटरी इंटेलिजन्स पुणे यांनी कारवाई करत भांडाफोड केला आहे. यामध्ये पोलिसांनी सत्यजित भरत कांबळे या आरोपीला अहमदनगरच्या श्रीरामपूर येथून अटक केली आहे. लष्करात भरती करून देतो असं सांगत आरोपी सत्यजित कांबळे आणि त्याचे साथीदार अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र आणि इतर राज्यातील बेरोजगार सुशिक्षित तरुणांकडून प्रत्येकी 7 ते 8 लाख रुपये घ्यायचे. 


भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक तरुणांकडून 7 ते 8 लाख रुपये उकळून त्यांना फेक नियुक्ती पत्र आणि फेक ओळखपत्र द्यायचे. एवढेच नव्हे तर कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी महाराष्ट्राबाहेर ट्रेनींग कॅप देखील उभारले असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात नाशिक येथे राहणाऱ्या भगवान घुगे बोगस भरती झालेल्या तरुणांच्या लक्षात आल्या नंतर त्याने अहमदनगर येथील लष्कर हद्दीत असलेल्या भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. 


 आरोपी सत्यजित कांबळेचा घेतला शोध


पोलिसांनी याबाबत मिलिटरी इंटेलिजन्स पुणे यांना याबाबत माहिती दिली होती. त्यानुसार पोलीस आणि मिलीटरी इंटेलिजन्स यांनी आरोपी सत्यजित कांबळे याचा शोध घेतला आता पोलीस आणि मिलीटरी इंटेलिजन्स कांबळे यांच्या साथीदारांच्या शोध घेत आहेत. भिंगार कॅम्पचे पोलीस अधिकारी जगदीश मुलगीर यांनी यासंदर्भात माहिती दिली.