दत्तात्रय गडगे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ खून प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. या प्रकरणात पत्नीनेच पतीच्या खुनाची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई याप्रकरणी सात आरोपींना अटक केली आहे. या हत्या प्रकरणात पत्नीच सुत्रधार असल्याचे समोर आल्यामुळे नगरमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

30 जानेवारी रोजी फिर्यादी आरती योगेश शेळकेने (26) चार शस्त्रधारी अज्ञातांनी घरात प्रवेश करत पती मयत योगेश सुभाष शेळके झोपेत असताना त्यांच्या गळ्यावर, हातावर, पायावर कोयत्याने वार करुन त्यांना ठार केल्याचे म्हटलं होतं. माझ्या गळ्याला कोयता लावून जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही आरती शेळकेने म्हटलं होतं. याची फिर्याद आरतीने बेलवंडी पोलीस ठाण्यात दिली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळाला भेट दिली व तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्याकडे दिला.


घटनास्थळापासून जवळच तपास करता असताना पोलीस पथकाचा फिर्यादी आरतीवरचा संशय बळावत गेला. सुरुवातीला घटनेला कुठलाही आधार नव्हता. मात्र, मयताचा भाचा शुभम लगड याच्या मोबाईलवर रोहित साहेबराव लाटे हत्येच्या दिवशी फोन आलेला दिसून आला. लागलीच पोलीस पथकाने पुणे येथून रोहितला ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखवताच त्याने फिर्यादी आरती व त्याचे अनैतिक संबंध असल्याचे कबुल केले.


रोहितने नियोजन करुन इतर पाच आरोपींसह दीड लाखांची सुपारी देवून हा खून केल्याचे कबुल केले. यामधे फिर्यादी आरती योगेश शेळके वय 26, रोहीत साहेबराव लाटे वय 23, दोन्ही रा. कोथुळ, ता. श्रीगोंदा, शोएब महमंद बादशाह, वय 22 रा. सेक्टर डी लाईन, ट्रॉम्बे, मुंबई, विराज सतिष गाडे, वय 19 रा. सोलापुर बाजार, कॅम्प पुणे, आयुष शंभु सिंह, वय 18, पृथ्वीराज अनिल साळवे, वय 19, अनिश सुरेंद्र धडे वय 19  अशा एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बेलवंडी पोलीस करत आहेत.