लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनं अहमदनगर जिल्हा (Ahmednagar Crime) पुन्हा एकदा हादरला आहे. जागेवरुन झालेल्या वादातून शेजाऱ्याने अडीच वर्षाच्या बाळासह त्याच्या आईची गाडीखाली चिरडून हत्या केली आहे. या सगळ्या प्रकारानंतर आरोपी फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला आहे. पोलिसांनी मायलेकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. मृत महिलेच्या सासूच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंगावर कार घालून माय लेकाचा खून केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे घडली आहे. घराच्या जागेवरून सुरु असलेल्या वादातून भरधाव कार अंगावर घालून शेजारीच राहणाऱ्या महिलेसह तिच्या अडीच वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. यामध्ये शितल येनारे आणि स्वराज येनारे या माय लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी मृत महिलेची सासू चंद्रकला येनारे यांच्या फिर्यादीवरून किरण श्रीमंदिलकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 


श्रीमंदिलकर आणि येनारे हे कुटुंब शेजारी शेजारी राहतात. घराशेजारच्या जागेच्या मोजणीतून दोन्ही कुटुंबात वाद होता आणि त्यातूनच ही घटना घडली असल्याची शक्यता आहे. गुरुवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.


नेमकं काय घडलं?


गुरुवारी संध्याकाळी शीतल येनारे त्यांच्या अडीच वर्षांच्या मुलाला जेवण भरवत बाहेर बसल्या होत्या. त्याच वेळी आरोपी कारने तिथे आला. त्यानंतर त्याने शीतल व स्वराज यांच्या अंगावर कार घातली. दोघांचा आवाज ऐकून शीतलच्या सासू चंद्रकला घराबाहेर आल्या. त्यावेळी शीतल व स्वराज रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. चंद्रकला येनारे यांची आरडाओरड ऐकून आजूबाजूच्या लोकांनी तिकडे धाव घेतली आणि जखमींना गाडीखालून बाहेर काढले. दोघांनाही तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी नगरला हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शीतल यांना नगर येथील शासकीय रुग्णालयात तर स्वराजला विळद घाटातील विखे पाटील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान शीतल यांचा गुरुवारी रात्री 9 वाजता, तर स्वराजचा मध्यरात्री एक वाजता मृत्यू झाला.