धडाम आवाज झाला! आकाशातून आलेली वस्तू छप्पर फोडून घरात आदळली, नगरमध्ये खळबळ
कोपरगावात मंगळवारी आकाशातून अचानक उल्का सदृष्य वस्तू एका घरावर आदळली, यात घराचं नुकसान झालं वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत
कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : कोपरगावातील (Kopargaon) भोजडे शिवारात मंगळवारी सकाळी घडलेल्या एका घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याबाबत अनेकांकडून तर्क वितर्क वर्तवले जात आहेत. भोजडे गावात किरण ठाकरे यांचं कुटुंब राहतं. मंगळवारी सकाळी आकाशातून आलेली एक वस्तू घराचं छप्पर फोडून जमिनीवर आदळली. यामुळे घराच्या छताला मोठं भगदाड पडलं असून जमिनीवरही जवळपास अर्धाफटू खड्डा झाला आहे. अचानक घडलेल्या या घटनेने किरण ठाकरे यांच्या कुटुंबात भीतीचं वातावरण निर्माण झालं. सुदैवाने यात कोणीही जखमी झालं नाही.
आकाशातून आलेली ती वस्तू कोणती?
या घटनेने वेगवेगळे तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. पण नेमकी ही वस्तू काय आहे हे कोणालाच कळेना. दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी भेट दिली. ही वस्तू उल्का सदृश्य वस्तू (Meteorite broke home) असल्याचं निदर्शनास आले असून या वस्तूचे नमुने तपासण्यासाठी पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत. दगडा सारखी ही वस्तू असून खगोलशास्त्र विभागाकडे (Department of Astronomy) तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती कोपरगाव पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली.
भोजडे चौकी परिसरातील किरण ठाकरे यांच्या घरावर अवकाशातून दगडासारखी टणक वस्तू पहाटेच्या सुमारास घराचा पत्रा छेदून पडल्याने ठाकरे कुटुंबीयांसह परिसरात एकच धावपळ उडाली. पडलेली वस्तू ओबडधोबड आकाराची असल्याची माहिती घरमालक किरण ठाकरे यांनी दिली. पहाटेच्या दरम्यान अचानक घरावर दगडफेक झाल्याचा भास ठाकरे कुटुंबाला झाला होता, मात्र शेजारी राहणाऱ्या महेंद्र सिनगर यांनी आकाशातून चमकत जमिनीच्या दिशेने झेपावणारी वस्तू पाहिल्याचं सांगितलं.
घरात जमिनीवर ज्या ठिकाणी ही उल्का सदृष्य वस्तू आदळली त्या ठिकाणी जमिनीवर साधाराण अर्धा फूट खोल खड्डा पडला आहे. सुरुवातीला जोरदार आवाज झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क नागरिकांमधून लावले गेले, कोणी बॉम्ब सदृष्य वस्तू असल्याचं सांगितल तर कोणी गॅस टाकी फुटली अशी चर्चा सुरू होती.