Nilesh Lanke vs Sujay Vikhe Patil : अहमदनगर... क्षेत्रफळाच्या बाबतीत राज्यातला सर्वात मोठा जिल्हा... गोदावरी आणि प्रवरा नदीमुळं सुबत्ता आलेला हा भाग... तर कायम दुष्काळी छायेत असलेले काही तालुके.. पद्मश्री दिवंगत विठ्ठलराव विखेंच्या प्रवरानगर कारखान्यामार्फत सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवणारा जिल्हा... ग्रामविकासाचा आदर्श उभा करणारे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे... जलसंधारणामध्ये क्रांतीकारी काम करणारे पोपटराव पवारांचा जिल्हा... मात्र दक्षिण नगरमधल्या अनेक समस्यांवर अजून उत्तर सापडलेलं नाही. (Ahmednagar Lok Sabha Election 2024)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समस्यांचं 'नगर' 


संभाजीनगर आणि पुणे यांच्या मधोमध असूनही नगरमध्ये औद्योगिक वसाहतींचा विकास झालेला नाही. त्यामुळं बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला नाही. कुकडी, साकळाई, वांबोरी चारी इथल्या सिंचनाचा आणि पाण्याचा प्रश्न कायम आहे. नगर जिल्ह्याच्या 'अहिल्यानगर' नामांतराचा मुद्दाही निवडणुकीत कळीचा ठरणाराय. आतापर्यंत रस्त्यांचा विकास रखडला होता. मात्र गेल्या ५ वर्षांत झालेल्या राष्ट्रीय महामार्गांमुळं आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू या दक्षिणेतल्या राज्यांना हा जिल्हा जोडला गेलाय.


अहमदनगरचं राजकीय गणित 


कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी अहमदनगरची ओळख होती. मात्र गेल्या तीन निवडणुकांमध्ये इथं भाजपनं भगवा झेंडा रोवण्यात यश मिळवलंय. 2009 मध्ये भाजपचे दिलीप गांधी यांनी राष्ट्रवादीच्या शिवाजी कर्डिलेंचा ४६ हजार मतांनी पराभव केला. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या राजीव राजळेंना २ लाख मतांनी पराभूत केलं. 2019 मध्ये भाजपनं राधाकृष्ण विखे पाटलांचे चिरंजीव सुजय विखे पाटलांना मैदानात उतरवलं. त्यांनी राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांना तब्बल पावणे तीन लाख मतांनी हरवलं. विधानसभेचा विचार केला तर सध्या राष्ट्रवादीचे 4 आणि भाजपचे 2 आमदार आहेत.


यंदा भाजपनं पुन्हा एकदा डॉ. सुजय विखे पाटलांना उमेदवारी दिलीय. तर आमदारकीचा राजीनामा देऊन निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं लोकसभेच्या रणांगणात उतरणार आहेत. लंकेंचा तगडा जनसंपर्क पाहता विखे विरुद्ध लंके अशी जोरदार काँटे की टक्कर इथं रंगणार आहे. सगेसोयरे आणि सोय-या धाय-यांचं राजकारण, हे नगरच्या राजकारणातलं प्रमुख वैशिष्ट्यं... इथं विखे विरुद्ध थोरात असा उभा राजकीय संघर्ष आहे. या संघर्षात थोरातांचे नातेवाईक असलेले राजळे, त्यांचे नातेवाईक असलेले गडाख, कर्डिलेंचे जावई असलेले संग्राम जगताप आणि संदीप कोतकर नेमकी काय भूमिका घेतात, यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे.


दरम्यान, नगरमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा थेट मुकाबला होणार आहे. असं असलं तरी इथलं सोयऱ्या धायऱ्यांचं राजकारण निर्णायक ठरणार आहे. सगेसोयऱ्यांचं गणित जुळवण्यात कोण यशस्वी होतो, ते येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल.