कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगरच्या (Ahamednagar) गुहा गावातील ग्रामास्थ प्रशासनाविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. गावात सध्या प्रचंड तणावाची स्थिती आहे. या गावात कानिफनाथ महाराजांचं मंदिर (Kanifnath Mahraj Mandir) असून अनेक वर्षांपासून इथं दर गुरूवारी भाविक आरती करतात. मात्र मध्यरात्रीपासून प्रशासनानं अचानकपणे आरती करण्यास मनाई करत जमावबंदी आदेश लागू केले. मंदिराशेजारी मशिद असून न्यायालयीन लढाई (Court Battle) सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंदिर (Temple) आणि मशिदीच्या (Mosque) वादात सामाजिक सलोखा राखण्याऐवजी प्रशासनानं थेट आरतीला मनाई केल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलीय. प्रशासनाचा निषेध करण्यासाठी गुहा गावातील संतप्त नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं..
 
का पेटला कानिफनाथचा वाद? 
कानिफनाथ मंदिराच्या नावे असलेली 40 एकर जमीन कुणालाही कल्पना न देता परस्पर वक्फ बोर्डाकडे (Waqf Board) हस्तांतरित करण्यात आली आणि कागदोपत्री मंदिराचं नाव हटवून हजरत रमजान बाबा दर्गा असा उल्लेख करण्यात आला, असा आरोप करत ग्रामस्थांनी याविरोधात न्यायालयीन लढा सुरू केलाय. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना प्रशासनानं घेतलेली एकतर्फी भूमिका ग्रामस्थांना मान्य नाही. तर दुसरीकडे अधिका-यांनी मात्र प्रतिक्रिया देणं टाळलंय. 






खरं तर प्रशासनानं हा वाद वाढवण्याऐवजी दोन्ही समाजाचं म्हणणं ऐकून घेत सामोपचारानं तोडगा काढणं अपेक्षित होतं. मात्र लोकभावनेचा विचार न करता इथं थेट चार महिन्यांसाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आलाय. मार्च महिन्यात कानिफनाथ महाराजांची यात्रा आहे. त्यामुळे हा उद्रेक आणखी वाढण्याची शक्यता आहे.