लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : लावणी (Lavni) डान्सर गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) नृत्याने महाराष्ट्रातल्या तरुणाईला वेड लावलं आहे. दुसरीकडे गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि गोंधळ हे समीकरण देखील ठरलेलं आहे. क्वचितच गौतमीच्या कार्यक्रमात गोंधळ झाला  नाही असं घडलं आहे. मात्र आता हा वाढता गोंधळ पाहून गौतमीने मोठा निर्णय घेतला आहे. जर यापुढे गोंधळ झाला तर आपण कार्यक्रम करणार नसल्याचे गौतमी पाटीलनं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदनगरमध्ये गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पुन्हा राडा झाला आहे. अहमदनगरच्या नागापूर येथे मंगळवारी रात्री आयोजित कार्यक्रमांमध्ये गोंधळ झाल्यानंतर प्रेक्षकांनी दगडफेक देखील केली. या दगडफेकीत काही प्रेक्षक किरकोळ जखमी झाले आहेत. नागापूर येथे एका लहान मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गौतम पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अर्धा तासाच्या कार्यक्रमानंतर हुल्लडबाजांनी धुडगूस घालत दगडफेक केली.


दगडफेकीनंतर कार्यक्रमांमध्ये गोंधळ निर्माण होऊन धावपळ सुरू झाली. परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. मात्र गौतमीला आपला कार्यक्रम बंद करावा लागला. असे हुल्लडबाज प्रेक्षक जिथे असतील त्या ठिकाणी आपण कार्यक्रम करणार नसल्याचे देखील गौतमी पाटील हिने सांगितल आहे. तसेच दगड मारता मनाला थोडीतरी लाज वाटते का? कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. एखाद्याचा जीव गेल्यावर तु्म्हाला जाग येणार काय? असा सवाल आयोजकांनी केला.


"खरंतर खूप दिवसांनी कार्यक्रम झाला आहे. माणसं खूप असली की मागच्या लोकांना कार्यक्रम दिसत नाही. म्हणून थोडीफार गडबड होत असते पण तो काही विषय नाही. पण कार्यक्रम छान झाला. थोडा गोंधळ झाल्यामुळे कार्यक्रम तिथल्या तिथेच बंद केला. तु्म्हाला दगडफेक करायची असेल तर माझ्या कार्यक्रमाला येऊ नका. प्रत्येकाच्या घरात आई बहिण आहे. आम्हीसुद्धा कलाकार आहोत. तुमचं मनोरंजन करण्यासाठी आम्ही येतो. तुम्ही त्याचा आनंद घ्या. आम्हीसुद्धा तुमचं छान मनोरंजन करु. तुम्ही असली कामं करु नका किंवा येऊ नका. असा गोंधळ झाल्याने मी कार्यक्रम लगेच बंद केला. आयोजकांना मी म्हणते की बंदोबस्त व्यवस्थित करा. जर असे काही झाले तर इथून पुढे मी कार्यक्रम बंद करणार," असे गौतमी पाटीलनं म्हटलं आहे.