कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगर (ahmednagar) जिल्ह्याच्या पश्चिमेला अकोले (Akole) तालुक्यात सह्याद्रीच्या रांगामध्ये असलेली सांधण व्हॅली (sandhan valley) नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत आली आहे. अनेक ट्रेकर्स सांधणच्या घळीतून उतरणारा ट्रेक करत अविस्मरणीय अनुभव गाठीशी जोडत असतात. भंडारदरा धरणालगत सांम्रद गावापासून पुढे दीड ते दोन किमी नागमोडी वळणे घेत जाणारी ही खोल दरी ट्रेकर्ससह इतर भटक्यांनाही मोहात पाडते. पण याच सांधण व्हॅलीत मुंबईच्या (Mumbai News) एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. ट्रेकिंगसाठी गेलेल्या या तरुणीच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोले तालुक्यातील पर्यटकांना आकर्षित ठरणाऱ्या सांधण व्हॅलीत पडून मुंबईतल्या एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईहून पर्यटनासाठी आलेल्या चार तरुणींपैकी एकीचा सांधण दरीत पाय कोसळून पडल्याने मृत्यू झाला आहे. ऐश्वर्या खानविलकर असे 24 वर्षीय मुलीचे नाव असल्याचे समोर आलं आहे. ऐश्वर्या खानविलकर ही मुंबईच्या दहिसर परिसरात राहायला होती. ऐश्वर्या तीन मैत्रिणींसह सांधण दरी पाहण्यासाठी आली होती. मात्र सकाळी 11 च्या सुमारास पाय घसरुन पडल्याने ऐश्वर्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्यासह चार तरुणी सकाळीच साडे सहा वाजता मुंबई येथून भंडारदरा परिसरात पर्यटनासाठी आल्या होत्या. भंडारदरा धरणाचा परिसर पाहिल्यानंतर चौघीजणी सांधण दरीत पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या ग्रुपमधील ऐश्वर्या खानविलकरचा एका खडकावरुन पाय घसरला. त्यामुळे ती दहा ते पंधरा फूट खाली पडली. खाली पडल्यामुळे ऐश्वर्याचे डोकं थेट खडकावर आपटलं. यामुळेच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.


दरम्यान, घटनेची घटनेची माहिती मिळताच राजुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने ऐश्वर्याचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला आहे. त्यानंतर मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. अकोले ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचा पंचनामा करण्याचे काम सुरु आहे. दुसरीकडे, सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भंडारदरा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे निसर्गाचा आनंद घेताना काळजी घेण्याचं आवाहन वनविभागासह पोलिसांनी केले आहे.