अहमदनगर : शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी रविवारी राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांची भेट घेतलीय. त्यांच्या भेटीतील चर्चेचा तपशील अद्याप कळलेला नाही मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. प्रवरानंगर इथल्या विखे पाटील सहकारी साखर कारखाण्यावर ही भेट झालीय. रोहित पवार यांची सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलंय. विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातील विळ्या-भोपळ्याचं नातं अवघ्या महाराष्ट्रला माहीत आहे. मात्र रविवारी झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहे. 


रोहित पवार आणि सुजय विखे पाटील

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी रविवारी दुपारी सोलापूर-धुळे महामार्गाजवळ प्रवरानगर इथल्या विखे-पाटील कारखान्यास सदिच्छा भेट दिली. उल्लेखनीय म्हणजे, प्रवरानगर इथं स्थित असलेला हा साखर कारखान्याची ओळख 'आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना' अशी आहे. 


यावेळी विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला. रोहित आणि सुजय या दोघांच्या भेटीचे हे फोटो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेत. 



रोहीत हा शरद पवाराचा चुलत नातू अर्थात शरद पवारांचे मोठे बंधू अप्पासाहेब पवार यांचा नातू आणि राजेंद्र पवार यांचा मुलगा आहे. या दोघांच्या भेटीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीतील जवळकीची चर्चा जोरात रंगू लागलीय.