शिवतारेंच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणाऱ्या `झी मीडिया` धमकावण्याचा प्रयत्न
जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या कुटुंबीयांच्या खासगी साखर कारखान्यासाठी नियम कसे पायदळी तुडवले जातायत, याचा पर्दाफाश `झी २४ तास`नं केलाय. मात्र, याबाबत शिवतारेंपैकी कुणीही बोलायला तयार नाही. हा गैरव्यवहार उघड करणाऱ्या आमच्या टीमलाच दादागिरी करण्यात आली.
नितीन पाटणकर, झी मीडिया, अहमदनगर : जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या कुटुंबीयांच्या खासगी साखर कारखान्यासाठी नियम कसे पायदळी तुडवले जातायत, याचा पर्दाफाश 'झी २४ तास'नं केलाय. मात्र, याबाबत शिवतारेंपैकी कुणीही बोलायला तयार नाही. हा गैरव्यवहार उघड करणाऱ्या आमच्या टीमलाच दादागिरी करण्यात आली.
अहमदनगर जिल्ह्यातील स्वामी समर्थ शुगर अँड ऍग्रो इंडस्ट्रीज या खासगी कारखान्यातील कथित बेकायदा कामं आणि गैरकृत्यं 'झी २४ तास'नं उजेडात आणली. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारेंच्या मुलाचा हा कारखाना... आमची टीम तिथं पोहोचली, तेव्हा शिवतारेंच्या कामगारांनी दमदाटी केली. चित्रीकरण बंद पाडण्याचा प्रयत्न केला...
दोन वॉचमन सतत 'झी २४ तास' टीमच्या मागे फिरत होते. तुमचं म्हणणं कॅमेऱ्यासमोर सांगा म्हटल्यावर मात्र त्यांनी काढता पाय घेतला.
विशेष म्हणजे या सगळ्या गैरकारभाराबाबत शिवतारे कुटुंबीयांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला... पण त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
साखर आयुक्त म्हणतात...
याबाबत आम्ही साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांचीही भेट घेतली... शिवतारेंच्या कारखान्याविरोधात शेतक-यांच्या तक्रारी आल्याचं साखर आयुक्तांनी सांगितलं. त्यानुसार नगरच्या साखर सह-संचालकांना चौकशी करण्यास सांगितलंय. मात्र आताच कोणतीही कारवाई करता येणार नाही... कारखान्यासाठी कुठलीही एनओसी किंवा इतर कुठल्या मान्यतेसाठी प्रस्ताव आल्यावरच आम्ही कारवाई करू शकतो, असं साखर आयुक्तांनी सांगितलं. इतर सरकारी अधिका-यांनी मात्र याबाबत मूग गिळून गप्प बसणंच पसंत केलंय.