अहमदनगर :  शेवगावमधल्या आंदोलनानंतर साखर आयुक्तांनी शेतकरऱ्यांशी चर्चेची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात आंदोलक, पोलीस अधीक्षक आणि प्रांत अधिकऱ्यांसोबत साखर आय़ुक्तांची बैठक सुरू आहे. शेवगाव तहसील कार्यालयात ही बैठक होत आहे. उसाच्या हमीभावासाठी शेतक-यांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस दरासाठी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला आणि हवेत गोळीबारही केला. यात तीन शेतकरी जखमी असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.


या प्रकरणामुळे शेतकरी आणखीनच पेटले आंदोलन अनियंत्रीत झालं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं असून, ७ गावांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव आणि पैठणमध्ये ऊसाला 3100 रूपयांचा दर मिळावा यासाठी आंदोलन पुकारण्यात आलं आहे.


सकाळपासून आंदोलकांनी रस्त्यांवर टायर जाळून आपला रोष व्यक्त केला. तसंच अडवलेल्या वाहनांच्या चाकांची हवाही सोडली. मात्र पोलिसांनी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्रातील अध्यक्ष प्रकाश बालवडकर आणि अमर कदम यांना बळाचा वापर करून पहाटेच अटक केली. त्यामुळं संतप्त शेतक-यांनी जाळपोळ आणि रास्तारोको सुरू केला.