मुकुल कुलकर्णी, प्रतिनिधी, झी मीडिया, नाशिक : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नाशिकहून मुंबई पुणे शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेला अखेर मुहूर्त लागलाय. हवाई सेवा सुरू होणार असल्याने शहराच्या विकासाला चालना मिळेल असा आशावाद व्यक्त होतेय. तसंच शेतीमालासाठीही कार्गोसेवा सुरू करण्याची मागणी होतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिककरांचं उड्डाणाचं स्वप्न अखेर पूर्ण होताना दिसतंय. २३ डिसेंबरपासून नाशिकहून मुंबई आणि पुण्यासाठी विमानसेवा सुरू होतेय. नाशिकहून मुंबईला सकाळी ६.३० वाजता तर पुण्याला संध्याकाळी ८ वाजून २० मिनिटांनी उड्डाण होईल. मुंबईहून नाशिकला संध्याकाळी ५ वाजून १० मिनिटांनी तर पुण्याहून संध्याकाळी सात वाजून 20 मिनिटांनी विमान झेपावणार आहे.


विमानसेवेमुळे वाहतुकीचा वेळ वाचेल, उद्योगाला चालना मिळेल, नवनवे उद्योजक नाशिककडे येतील असा अंदाज व्यक्त होतोय. नाशिक जिल्ह्यातील शेतीमाल, डाळींब, द्राक्ष, स्ट्रॉबेरी या शेतीमालालाही इतर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कार्गो सेवा सुरू करावी अशी मागणी केली जातेय.


धार्मिक, पौराणिक वारसा जपणारं नाशिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचं शहर असल्याने पर्यटनाला चालना मिळून रोजगारात वाढ होईल असा आशावाद आहे. विमानसेवा सुरळीत राहिली तर ही स्वप्न प्रत्यक्षात येतील.


आजवर दोन तीन वेळा विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न झाला पण त्याला प्रतिसाद नसल्याचं कारण देत विमानसेवा गुंडाळण्यात आला. आताही मार्चपर्यंतचंच वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे पुढच्या प्रवासाविषयी लोकप्रतिनिधी साशंक आहेत.