मुंबई : फेक कॉल ऍपद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवार यांच्या मोबाईल नंबरचा गैरवापर करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या मोबाईल नंबरचा वापर करून बिल्डरकडे 20 लाखाची खंडणी मागितली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाडेबोल्हाई येथील जागेचा वाद सोडवण्याबाबत धमकी देखील देण्यात आली. या प्रकरणाची गंभीर दखल गुन्हे शाखेनं घेतली.  या प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.


नवनाथ भाऊसाहेब चोरामले (वय 28, रा हवेली), सौरभ नारायण काकडे (वय 20 रा हडपसर), सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे (वय 28), किरण रामभाऊ काकडे (वय 25), चैतन्य राजेंद्र वाघमारे (वय 19 रा भेकराई नगर, फुरसुंगी), आकाश शरद निकाळजे (वय 24) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. 



याबाबत बांधकाम व्यावसायिकाने बंडगार्डन पोलिस ठाण्यात खंडणी मागितल्या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. हा प्रकार मागील दहा दिवसांपासून सुरू होता. आरोपी उपमुख्यमंत्री यांचा पीए चौबे बोलतोय असं सांगून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करत होता. 


मिळालेल्या माहितीनुसार गुगल प्ले स्टोअरवरून आरोपींनी फेक कॉल अॅप डाऊनलोड केलं. या ॲपद्वारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून त्यावरून व्यवसायिकाला संपर्क केला. 


आरोपी त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चौबे बोलतोय असे सांगत होते. आरोपींनी व्यवसायिकाला हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई येथील शिरसाटवाडीमधील एका जमिनीचा वाद मिटवून टाका. नाहीतर गावात पाऊल ठेवू देणार नाही, त्यांचा कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही अशी धमकी दिली. त्यासोबत 20 लाख रुपयांची खंडणी मागून यातील दोन लाख रुपये घेतले.


या प्रकरणी व्यवसायिकाने पोलिसांना सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर गुन्हे शाखेनं उपमुख्यमंत्र्यांचा मोबाईल नंबरचा गैरवापर करून खंडणी मागितल्या प्रकरणी 6 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.